महाराष्ट्रावर झोंबणाऱ्या शीतलहरींचा प्रहार; पुढील 48 तास सतर्कतेचा इशारा.!!!
मुंबई प्रतिनिधी :-
उत्तर भारतातील पर्वतीय भागांसह मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानात झालेल्या तीव्र घटीनंतर त्याचा परिणाम आता मध्य भारतासह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तासांसाठी महाराष्ट्रात शीतलहरींचा इशारा जारी केला आहे.
राज्याच्या उत्तरेकडील पट्ट्यातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः घाटमाथ्यावर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या झोंबणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घाट क्षेत्रासह मैदानी भागांमध्ये धुक्याची चादर पसरत असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा प्रशासन आणि हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबई–उपनगरांमध्येही गारठा
मुंबई शहर व उपनगरांमध्येही थंडीचा प्रभाव वाढताना दिसत असून, किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. शहरात सकाळच्या वेळी हलकं धुकं जाणवणार असून सायंकाळनंतर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होत असून ही स्थिती सोलापूरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात जाणवणाऱ्या शीतलहरींसारखीच थंडी आता महाराष्ट्रात जाणवत असल्याने नागरिकांमध्ये घराबाहेर पडायचं की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मराठवाडा–विदर्भालाही फटका
कोकण, मराठवाडा आणि विदर्भ हे भागही या शीतलहरींपासून सुटलेले नाहीत. नांदेड, परभणी, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. शीतलहरी हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असून, पुढील 48 तासांत हवामानात फारसे बदल अपेक्षित नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक कारणांशिवाय पहाटे आणि रात्री उशिरा बाहेर पडू नये, उबदार कपडे वापरावेत आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन केलं आहे.
