भुसावळ येथे प्रथमच दोन दिवसीय भव्य भिक्खुणी धम्म परिषद
महिला संघाचा ऐतिहासिक व गौरवशाली उपक्रम

भुसावळ येथे प्रथमच दोन दिवसीय भव्य भिक्खुणी धम्म परिषद
महिला संघाचा ऐतिहासिक व गौरवशाली उपक्रम
भुसावळ प्रतिनिधी :- अरुण तायडे
भुसावळ शहराच्या सामाजिक व धार्मिक इतिहासात प्रथमच दोन दिवसीय भिक्खुणी महिला संघ धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील कृष्णचंद्र सभागृहात शनिवार, दि. २१ आणि रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत ही ऐतिहासिक परिषद संपन्न होणार आहे. या परिषदेचे आयोजन भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने करण्यात आले असून, शहरासह संपूर्ण तालुका व जिल्ह्यातील बौद्ध समाजात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पूज्य भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना विराजमान राहणार आहेत. त्या बोधिपक्खिय धम्म फाउंडेशनच्या संस्थापक असून, बोधगया येथे आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चॅन्टिंग सेरेमनीच्या कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अभिधम्मपिटक या विषयातील सखोल अभ्यासासाठी त्या सुवर्णपदक (गोल्ड मेडलिस्ट) प्राप्त अभ्यासिका व शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. देश-विदेशात धम्म प्रचार, प्रशिक्षण व अभ्यासवर्गांच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
समाजाला वैचारिक दिशा देणे, बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा व समतेच्या विचारांचा प्रसार करणे, तसेच स्त्री-पुरुष समानतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या दोन दिवसीय परिषदेत नामवंत व अनुभवी भिक्खुणी संघाच्या प्रेरणादायी धम्मदेशना आयोजित करण्यात आल्या आहेत.
या परिषदेत पूज्य नागकन्या थेरी अय्याजी, पूज्य विनयशिला थेरी अय्याजी, पूज्य उप्पलवना थेरी अय्याजी, पूज्य सुजाता थेरी अय्याजी, पूज्य श्रामणेरी रुपासरी तसेच पूज्य कुंडलकेशा अय्याजी या मान्यवर भिक्खुणी उपस्थित राहून धम्म, अभिधम्म, नैतिकता, सामाजिक बांधिलकी व स्त्री-सशक्तीकरण या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या धम्मदेशनेमुळे उपस्थित श्रोत्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा सखोल वैचारिक बोध होणार आहे.
भिक्खुणी संघाच्या माध्यमातून स्त्रियांचा धम्म कार्यातील वाढता सहभाग, समाजपरिवर्तनातील महिलांची भूमिका आणि बुद्धांच्या समतेच्या विचारांचा प्रचार या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः युवक-युवती, महिला वर्ग, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ही परिषद प्रेरणादायी ठरणार आहे.
या ऐतिहासिक व वैचारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण धम्म परिषदेचा लाभ जास्तीत जास्त समाजबांधवांनी घ्यावा, असे आवाहन भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. दोन दिवस चालणारी ही भिक्खुणी धम्म परिषद भुसावळच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनात एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय जोडणारी ठरणार आहे.



