चार नगरसेवकांचा सौहार्दपूर्ण सत्कार; भडगावच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले प्रभाग क्रमांक ३ चे शिवसेनेचे नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा व इमरान अली सय्यद तसेच प्रभाग क्रमांक ७ चे अपक्ष उमेदवार अलीम शाह आणि शिवसेनेचे उमेदवार हाजी खलील मिस्त्री यांनी निवडणुकीनंतर एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. या उपक्रमातून राजकीय सौहार्द, एकोपा आणि शहराच्या विकासासाठी सर्वसमावेशक सहकार्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते जमाल भाऊ कासार, पत्रकार अबरार मिर्झा, एच बी ए इंग्लिश मेडीयम स्कुलचे मुख्याध्यापक मुजम्मील शेख यांनी देखील निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला
निवडणूक काळात विविध मुद्द्यांवर मतभेद असले तरी निवडणुकीनंतर ते बाजूला ठेवून नागरिकांच्या हितासाठी एकत्र काम करणे ही काळाची गरज असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. भडगाव शहरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सेवा व शिक्षण या विषयांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर वेळेत तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या समजून घेऊन त्यावर टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
भडगावच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय पक्षभेद न ठेवता सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक असून, शहराचा विकास हाच एकमेव अजेंडा असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले. नागरिकांचा विश्वास व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सौहार्दपूर्ण भूमिकेमुळे नगरपरिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांच्या समस्या जलदगतीने मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या सत्कार सोहळ्याला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराच्या विकासासाठी सहकार्य व समन्वयाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे भडगाव शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.
