
जिल्हा परिषद मराठी शाळेत शिवजयंतीचा भव्य उत्सव; ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषांनी परिसर दुमदुमला.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६अखंड भारताचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारे महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद मराठी शाळेत गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिभावाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक ८.३० वाजता कार्यक्रमास प्रारंभ झाला. संपूर्ण शाळा परिसर भगव्या ध्वजांनी सजविण्यात आला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती (SMC) चे सदस्य श्री. धनराज पाटील सर हे उपस्थित होते. यावेळी SMC चे इतर पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
शिवजयंतीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत शाळेत उपस्थित राहिले होते. काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे मावळे, तर काहींनी राजमाता जिजाऊ, तानाजी मालुसरे आदी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ओघवत्या भाषणांतून शिवरायांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी, प्रशासन कौशल्य व रयतेप्रती असलेली कळकळ प्रभावीपणे मांडण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘शिवगर्जना’, पोवाडे व विविध शिवगीतांवरील नृत्यप्रस्तुतीने उपस्थितांची मने जिंकली. टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली.
अध्यक्षीय भाषणात श्री. धनराज पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक असल्याचे सांगितले. स्वराज्य, शिस्त, राष्ट्रप्रेम, न्यायप्रिय प्रशासन व सामाजिक समतेचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत, असे आवाहन त्यांनी केले. शिवरायांचा आदर्श केवळ जयंतीपुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनात आचरणात आणावा, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. व्यंकट बोरसे यांनी सर्व मान्यवर, पालकवर्ग व शिक्षकांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी व शिस्तबद्ध सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्री. रविंद्र कुंभार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदवीधर शिक्षक श्री. राजेंद्र कोळी, उपशिक्षिका श्रीमती मीना नेहरकर व श्रीमती राजश्री आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिवजयंती उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली असून इतिहासाबद्दल अभिमान व शिवरायांच्या विचारांची प्रेरणा निर्माण झाली आहे. संपूर्ण शाळा परिसर भक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणाने भारावून गेला होता.



