लाडकी बहीण’ योजनेत हालचाल; जानेवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता.

लाडकी बहीण’ योजनेत हालचाल; जानेवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता.
मुंबई :-
राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाबत दिलासादायक घडामोड समोर आली आहे. जानेवारी २०२६ च्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो लाभार्थी महिलांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याची शक्यता असून, यासाठी आवश्यक निधीची प्रशासकीय हालचाल सुरू झाली आहे.
सामाजिक न्याय विभागाने जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी ९८.४५ कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १८ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. निधी वर्ग झाल्याने संबंधित विभागांकडून अंतिम प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर हा हप्ता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
याआधीही या योजनेचे हप्ते टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर २०२५ च्या शेवटी आणि जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता १४ जानेवारी २०२६ च्या सुमारास वर्ग करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्याचा हप्ताही येत्या काही दिवसांत जमा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम महिलांच्या दैनंदिन गरजा, आरोग्य, पोषण तसेच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरत आहे. मात्र ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यांचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा ५०० रुपये देण्यात येतात. दुबार लाभ टाळण्यासाठी शासनाने ही तरतूद लागू केली आहे.
दरम्यान, या योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. जुलै २०२४ मध्ये योजना सुरू झाली तेव्हा राज्यभरातून सुमारे २ कोटी ४६ लाख महिलांनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी केवळ १ कोटी ९० लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. म्हणजेच सुमारे ५५ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे.
ई-केवायसी व आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता सुमारे १ कोटी ६० लाख महिलांनाच मिळू शकला. अनेक पात्र महिलांना केवळ तांत्रिक आणि कागदपत्रांच्या त्रुटींमुळे हप्ता मिळू न शकल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ई-केवायसी आणि कागदपत्र दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
प्रशासनाकडून संबंधित महिलांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी दिलेल्या मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे अद्ययावत करावीत. अन्यथा पुढील हप्त्यांपासून लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
एकूणच, जानेवारी महिन्याचा निधी वर्ग झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये आशेचे वातावरण आहे. आता प्रत्यक्ष हप्ता कधी जमा होतो, याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले असून, लवकरच अधिकृत वितरण तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.



