नरडाणा पोलिसांची मोठी कारवाई; 225 किलो 835 ग्रॅम अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा जप्त
₹21.18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपी चालक फरार, गुन्हा दाखल
धुळे प्रतिनिधी :-
धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी, अमली पदार्थांची वाहतूक व मालमत्तेच्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैध विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असलेला 225 किलो 835 ग्रॅम अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा (अमली पदार्थ) जप्त करण्यात आला असून, कारसह एकूण ₹21,18,075 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, प्रभारी अधिकारी, नरडाणा पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि. 21 जुलै 2026 रोजी रात्री 11.00 ते 22 जुलै 2026 रोजी सकाळी 8.00 या कालावधीत नरडाणा पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी परिसरात नाकाबंदी सुरू केली होती.
दि. 22 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 3.00 वाजता शिरपूरकडून साक्रीच्या दिशेने जाणारी टाटा आरिया प्रेस्टिज (क्रमांक MH-02/CD-0727) ही कार संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर वाहन सारवे गावाजवळ गेले. तेथील पोलीस पाटील विवेक भगवान सोनवणे व ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता, सारवे मराठी शाळेजवळील शेतात सदर कार आढळून आली. मात्र चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला होता.
वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये 225 किलो 835 ग्रॅम अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा (अमली पदार्थ) आढळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला.
हस्तगत मुद्देमाल
अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा (225 किलो 835 ग्रॅम) – ₹11,18,075
टाटा आरिया प्रेस्टिज कार (MH-02/CD-0727) – ₹10,00,000
दोन नंबर प्लेट (MP-09/ZQ-8382) – किंमत शून्य
एकूण जप्त मुद्देमाल : ₹21,18,075
या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 131/2026 दाखल करण्यात आला असून, गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 अंतर्गत कलम 8(क) व 15(क) नुसार अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, पोलीस नाईक रवींद्र महाले, विजय पाटील, पोलीस अंमलदार अजय सोनवणे, ललित पाटील, किरण साबळुडे, भरत चव्हाण, अर्पण मोरे, विजय माळी, सचिन वागुल, सुरजकुमार सावळे आदींच्या पथकाने केली.





