आपला जिल्हाक्राईममहाराष्ट्र

केमिकलपासून दूध बनवणाऱ्यांवर मोठी कारवाई,दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; ३ अटकेत, १७.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

केमिकलपासून दूध बनवणाऱ्यांवर मोठी कारवाई,दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; ३ अटकेत, १७.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर | दि. 15 फेब्रुवारी 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या दूध भेसळ माफियांचा स्थानिक गुन्हे शाखेने मोठा पर्दाफाश केला आहे. केमिकलपासून बनावट दूध तयार करून ते संकलित दुधात मिसळून बाजारात पुरवठा करणाऱ्या दूध संकलन केंद्रावर छापा टाकत तीन आरोपींना अटक करून १७ लाख ३२ हजार ८१६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत तपास सुरू असताना रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद, ता. जामखेड) हा त्याच्या दूध संकलन केंद्रात केमिकल वापरून दूध तयार करून ते संकलनात मिसळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. राजेश नामदेव बडे यांना घटनास्थळी पाचारण करून संयुक्त कारवाई करत सदर दूध संकलन केंद्रावर छापा टाकण्यात आला.

छाप्यावेळी घटनास्थळी

समीर कमरुद्दीन शेख (वय 30, रा. उंबरे, ता. राहुरी),

आफताब कलीम शेख (वय 28, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी),

रामदास नवनाथ उबाळे (वय 46, रा. फक्राबाद, ता. जामखेड)

हे तिघे मिळून आले.

पोलिस व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता संकलन केंद्रात ६ ड्रममध्ये १,१९८ लिटर Paraffin Oil, दूध पावडर व इतर केमिकल साठवलेले आढळून आले. आरोपींकडून चौकशी केली असता या केमिकलपासून दूध तयार करून ते संकलन झालेल्या दुधात मिसळले जात असल्याचे तसेच याच केमिकलपासून सुमारे २४ हजार लिटर दूध तयार करता येत असल्याची कबुली त्यांनी दिली.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी करून सदर केमिकलपासून तयार होणारे दूध मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे आहे, असे स्पष्ट केले.

या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल —

१,१९८ लिटर Paraffin Oil – ₹2,39,600

३०० किलो पांढरी पावडर – ₹81,056

३२० लिटर केमिकलपासून तयार दूध – ₹12,160

दोन पिकअप वाहने – ₹14,00,000

एकूण जप्त मुद्देमाल : ₹17,32,816

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 84/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 274, 275, 123, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26(1), 26(2)(i), 57 व 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!