
गावठी दारूचा आणखी एक बळी; नगरदेवळ्यात युवकाचा दुर्दैवी मृत्यू.!!!
वर्षभरात 31 वा बळी; अवैध दारू अड्ड्यांवर कारवाईची जोरदार मागणी
नगरदेवळा | प्रतिनिधी
नगरदेवळा परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिनधास्तपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या बेकायदेशीर धंद्याने पुन्हा एकदा एका तरुणाचा बळी घेतला आहे. कै. सीताराम सुखदेव भामरे यांचे ज्येष्ठ पुत्र गजानन सीताराम भामरे (आण्णा) यांचे शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4.10 वाजता दुर्दैवी निधन झाले. गावठी दारू पिल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीररीत्या बिघडली होती. मागील दोन दिवसांपासून ते आजारी होते; मात्र उपचार होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली.
या घटनेमुळे नगरदेवळा गावात शोककळा पसरली असून, गावठी दारूच्या अवैध व्यवसायाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भामरे कुटुंबीयांनी गजानन यांचा मृत्यू हा गावठी दारूमुळेच झाल्याचा ठाम आरोप केला असून, संबंधित दारू विक्रेते व पुरवठादारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वर्षभरात 31 तरुणांचा बळी; प्रशासन सुस्तच?
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरदेवळा आणि परिसरात गेल्या एका वर्षात गावठी दारूमुळे तब्बल 31 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असतानाही अवैध दारूचे अड्डे खुलेआम सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अत्यल्प पैशात जास्त नशा मिळत असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या आहारी जात आहे.
गावठी दारू तयार करताना मानवी शरीरासाठी अत्यंत घातक रसायने, औद्योगिक केमिकल्स आणि विषारी घटकांचा वापर केला जात असल्याने तरुणांचे आरोग्य आणि जीव दोन्ही धोक्यात आले आहेत. या दारूमुळे यकृत निकामी होणे, विषबाधा होणे आणि अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे – माजी उपसरपंच विलास भामरे
नगरदेवळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विलास राजाराम भामरे यांनी ‘दै. वृत्त’शी बोलताना सांगितले की, “गावठी दारूचा अवैध धंदा पूर्णपणे बिनधास्त सुरू आहे. तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आम्ही लवकरच जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक, पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच स्थानिक पोलिस निरीक्षक यांची भेट घेऊन लेखी निवेदन देणार आहोत. जोपर्यंत दारूचे अड्डे मुळासकट उद्ध्वस्त होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.”
संतप्त ग्रामस्थांचा सवाल; कठोर कारवाईची मागणी
गजानन भामरे यांच्या मृत्यूनंतर गावात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही ग्रामस्थांनी थेट गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाड टाकून ते उद्ध्वस्त करण्याची मागणी केली. मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माजी उपसरपंच विलास भामरे यांनी ग्रामस्थांना संयम राखण्याचे आवाहन करत कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा सल्ला दिला.
“1 ते 2 दिवसांत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन ठोस कारवाईसाठी लेखी निवेदन दिले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न; पण अड्ड्यांवर कारवाई गरजेची
दरम्यान, नगरदेवळा परिसरात पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे व्यसनमुक्तीसाठी उल्लेखनीय कार्य करत आहेत. आतापर्यंत त्यांनी शेकडो तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढले असून, काही तरुणांना स्वतःच्या खर्चाने व्यसनमुक्ती केंद्रात उपचारही करून दिले आहेत. तरुणांमध्ये चांगले संस्कार रुजावेत यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.
मात्र ग्रामस्थांचे स्पष्ट म्हणणे आहे की, व्यसनमुक्तीचे उपक्रम महत्त्वाचे असले तरी गावठी दारूचे अड्डेच जर सुरू असतील, तर हा प्रश्न कधीच सुटणार नाही. त्यामुळे व्यसनमुक्तीसोबतच अवैध दारू व्यवसायावर कडक आणि कायमस्वरूपी कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
एका होतकरू तरुणाच्या अकाली मृत्यूने नगरदेवळा गावावर शोककळा पसरली आहे.
गावठी दारूचा बेकायदेशीर व्यवसाय सुरूच का आहे.?
इतक्या मृत्यूनंतरही कठोर कारवाई का होत नाही.?
तरुणांचे जीव जात असताना प्रशासनाची जबाबदारी कुठे आहे?
या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे. वेळेत कठोर कारवाई झाली नाही, तर अशा दुर्दैवी घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



