
जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय डांगर बु येथे इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!!
अंमळनेर | प्रतिनिधी : – जितेंद्र वाघ
जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, डांगर बु (उदय नगर) येथे दि. 13 फेब्रुवारी 2026, शुक्रवार रोजी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वांचे प्रेरणास्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एच. एस. पाटील सर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता 8 वीची विद्यार्थिनी कु. ईश्वरी सतीश पाटील हिने आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी आवाजात केले. तिच्या सुस्पष्ट सूत्रसंचालनाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
यावेळी इयत्ता 5 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनीही शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन व शाळेतील अनुभव कथन करत भावना व्यक्त केल्या.
मुख्याध्यापक श्री. एच. एस. पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. परीक्षेची तयारी कशी करावी, वेळेचे योग्य नियोजन, मानसिक ताणतणावापासून दूर राहणे, तसेच आरोग्याची काळजी घेण्याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वर्षभरात शाळेत संपन्न झालेल्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे बक्षीस देण्यात आले. तसेच हिंदी व चित्रकला परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पेन बक्षीस देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मिष्टान्न भोजनाचा आनंद घेत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.



