
सामाजिक ऐक्याचे दर्शन; कजगावात भगवान एकलव्य जयंती उत्साहात.!!!
भडगाव ता प्रतिनिधी :- आमीन पिंजारी
कजगाव येथे भगवान वीर एकलव्य जयंती मोठ्या भक्तीभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात सामाजिक एकोप्याचे व संस्कृती जतनाचे दर्शन घडले. जयंतीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मान्यवरांच्या हस्ते भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी भगवान वीर एकलव्य यांच्या त्याग, निष्ठा, आत्मसंयम व गुरुभक्तीच्या आदर्शाचे स्मरण केले. त्यांच्या जीवनातून युवकांनी प्रेरणा घेऊन शिक्षण, शिस्त व परिश्रमाच्या मार्गावर वाटचाल करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
संध्याकाळी ढोल-ताशांच्या गजरात भगवान वीर एकलव्य महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या निनादाने आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला होता. लहान मुले, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाचीही मिरवणुकीत लक्षणीय उपस्थिती होती.
सालाबादप्रमाणे यावर्षीही नरेश प्रोव्हिजनचे संचालक नरेश धाडीवाल यांच्या वतीने भाविकांसाठी शरबत वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या सामाजिक उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आयोजकांचे कौतुक केले. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्ते, युवक मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. जयंतीच्या निमित्ताने समाजातील ऐक्य, बंधुभाव व सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आला. एकूणच कजगाव येथे भगवान वीर एकलव्य जयंतीचा सोहळा अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहात पार पडला.



