मळगावात बैलगाडा शर्यतीची रंगत,२५० बैलजोडींची झुंज; नंदकिशोर–बजरंग प्रथम.!!!

मळगावात बैलगाडा शर्यतीची रंगत,२५० बैलजोडींची झुंज; नंदकिशोर–बजरंग प्रथम.!!!
भडगाव ता.प्रतिनिधी :-
तालुक्यातील मळगाव येथे रमताबाबा यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीने परिसरात मोठीच रंगत निर्माण केली. पवन फॅन्स क्लब व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल २५० बैलजोडी सहभागी झाल्या होत्या. वेग, ताकद आणि शिस्तीचा संगम असलेल्या या शर्यतीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
मळगाव–बांबरुड रस्त्यालगत दुपारी १२.३० वाजता आखाडा पूजन करून मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भडगाव शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन राजेंद्र परदेशी, पत्रकार अशोक परदेशी, बंडू देवरे, शैलेश मोरे, शाम चित्ते, ईश्वर परदेशी, बालू पाटील, प्रताप परदेशी यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पंचमंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शर्यतीत नंदकिशोर व बजरंग या बैलजोडीने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला. चाळीसगाव तालुक्यातील मालक हर्षल राजपूत, पंकज राठोड व निंबा राठोड यांचा या यशात मोलाचा वाटा होता. फुलंब्री (जि. संभाजीनगर) येथील तेज्या व अर्जुन या बैलजोडीने द्वितीय क्रमांक मिळविला. गणेशपूर येथील काशी व बादल यांनी तृतीय, बाणगाव येथील कृष्णा व शंभू यांनी चतुर्थ, वडाळा येथील बाजी व वादळ यांनी पंचम, तर महाकाल व शिव या बैलजोडीने षष्ठ क्रमांक पटकाविला.
सर्वच बैलजोडींनी वेगवान व शिस्तबद्ध धाव घेत उपस्थितांची मने जिंकली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक बैलजोडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. “नाद करायचा नाही…” या घोषणांनी आखाडा दुमदुमून गेला. जळगाव, संभाजीनगर, धुळे, सातारा आदी जिल्ह्यांतील बैलगाडा शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यामुळे संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.
स्पर्धेचे पंच म्हणून दीपक पाटील, लखन बैरागी, धनसिंग परदेशी, चेतन पाटील, अभि परदेशी, तेजस पाटील, ऋषी परदेशी, अनिल परदेशी, किरण पाटील, निलेश राजपूत तसेच चाळीसगाव पंच कमिटीने जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन दीपक पाटील, लखन बैरागी, चेतन पाटील व धनसिंग परदेशी यांनी केले.
सायंकाळी बक्षीस वितरण समारंभात विजयी बैलजोडींच्या मालकांना फ्रीज, कपाट, सोफा सेट, ड्रेसिंग टेबल, पंखा, टेबल फॅन अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम शांततेत पार पडला. शेवटी तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात नाचत विजयी जल्लोष साजरा केला.



