जि. प.उर्दू बाईज शाळेत आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!
विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेचे धडे; पालक-ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथील जि. प. उर्दू बाईज शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला आनंद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्याचे आयोजन शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.
या आनंद मेळाव्यात विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. पावभाजी, मुगभजी, सँडविच, खमंग ढोकळा, चिवडा, पाणीपुरी, शेवपुरी, आलू चाट, रसगुल्ला आदी स्वादिष्ट पदार्थांनी मेळाव्यातील वातावरण रंगून गेले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थिनींनी विक्री, आर्थिक व्यवहार, ग्राहकांशी संवाद व व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून व्यवहारज्ञान, संघभावना तसेच नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत झाली. शालेय स्तरावरच उद्योजकतेचे प्राथमिक धडे मिळाल्याने पालक व उपस्थितांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
मेळाव्याला पालक, शिक्षक, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत विद्यार्थिनींच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक केले. उपस्थितांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत अशा उपक्रमांचे सातत्य राखावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भडगाव तालुका गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील व वर्षा मॅडम उपस्थित होते. केंद्रप्रमुख खलील सर, प्रमुख पाहुणे हाजी एतबार खान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजीर मुजावर, अल्ताफ शेख, साबीर कुरैशी, इमरान कुरैशी, पत्रकार अबरार मिर्झा आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि. प. उर्दू बाईज शाळेचे मुख्याध्यापक जाहीद बेग सर व लुकमान सिद्दीकी सर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी तबस्सुम बेगम सादिक अली,पटेल शिरीन, अमीर हमजा सय्यद, नसिरुद्दीन शेख तसेच जि.प.उर्दू कन्या शाळा नं.१ चे मुख्याध्यापक नईम शेख, हुजूर सर, अशफाक सर, इम्तियाज सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण मेळावा आनंदी, उत्साही व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
