भडगाव तालुका वकील संघात लोकशाहीचा निर्णायक कौल.!!!
‘बिनविरोध’ परंपरेला छेद देत ॲड. बी. आर. पाटील यांचा मतदानातून दणदणीत विजय
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुका वकील संघाच्या इतिहासात दि. ३१ डिसेंबर २०२५ हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला छेद देत यंदा प्रथमच थेट मतदानाच्या लोकशाही प्रक्रियेतून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या ऐतिहासिक निवडणुकीत अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान पटकावला असून, भडगाव तालुका वकील संघात हा विक्रम प्रथमच नोंदवला गेला आहे.
दीर्घकाळापासून संघात सहमती, समेट आणि बिनविरोध निवडीद्वारे पदांची भर पडत होती. मात्र यावेळी संघातील सदस्यांनी लोकशाही प्रक्रियेचा आग्रह धरत मतदानाद्वारे नेतृत्व ठरवण्याचा निर्णय घेतला. मतदानाची जोखीम पत्करूनही अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील यांनी थेट सभासदांच्या कौलावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास बहुमताच्या रूपाने अधोरेखित झाला.
या निवडणुकीत अध्यक्षपदासह अन्य प्रमुख पदांसाठीही चुरस पाहायला मिळाली. उपाध्यक्षपदी ॲड. गणेश आर. वेलसे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत संघातील तरुण नेतृत्वाला बळकटी दिली. सचिवपदी ॲड. प्रकाश जी. सोनवणे यांची निवड झाल्याने प्रशासनिक सुसूत्रता व कार्यक्षमतेचा संदेश संघाला मिळाला आहे.
विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत वकील संघाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग नोंदवला. ‘निर्णय प्रक्रियेत आम्ही सहभागी आहोत’ हे ठामपणे दाखवून देत सभासदांनी संघाच्या भविष्यासाठी सक्रिय भूमिका घेतली. ही उपस्थिती संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या निवडणुकीकडे केवळ पदाधिकाऱ्यांच्या निवडीपुरते न पाहता संघटनात्मक नेतृत्वावर दिलेला विश्वासाचा कौल म्हणून पाहिले जात आहे. बिनविरोध परंपरेऐवजी लोकशाही मार्ग स्वीकारून भडगाव तालुका वकील संघाने इतर संघटनांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
ॲड. बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव तालुका वकील संघ अधिक संघटित, पारदर्शक आणि सक्रिय होईल, अशी अपेक्षा वकील वर्गातून व्यक्त होत आहे.ही निवडणूक संघटनात्मक आत्मविश्वास, लोकशाही पुनरुज्जीवन आणि सक्रिय सहभागाचा जाहीरनामा ठरली आहे.
