जळगावमहाराष्ट्रसामाजिक

उदयनगर येथे ऐतिहासिक परंपरेला साजेल अशी भव्य शिवजयंती साजरी.!!!

उदयनगर येथे ऐतिहासिक परंपरेला साजेल अशी भव्य शिवजयंती साजरी.!!!

अंमळनेर प्रतिनिधी :-जितेंद्र वाघ

उदयनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या विचारांचा जागर करत सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही शिवजयंती उदयनगर ग्रामस्थांसाठी अविस्मरणीय ठरली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ हे होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पूजनावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी शिवरायांच्या कार्याला अभिवादन केले.

शिवजयंतीनिमित्त गावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्याख्यान व वक्तृत्व स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये गावातील शालेय विद्यार्थी, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वक्तृत्व स्पर्धेत शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, स्वराज्याची संकल्पना, त्यांचे पराक्रम, लोककल्याणकारी राज्यकारभार आणि आजच्या पिढीने त्यातून घ्यावयाचे धडे यावर प्रभावी मते मांडण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान सरपंच प्रकाश वाघ यांनी तरुण वर्गाला मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी व्याख्यान दिले. “शिवाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते, तर ते कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि सामान्य जनतेच्या कल्याणासाठी सदैव झटणारे लोकनायक होते. आजच्या तरुणांनी शिवरायांच्या शिस्त, धैर्य, स्वाभिमान व समाजहिताच्या विचारांचा अंगीकार करावा,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक विकास सोसायटीचे अध्यक्ष शांताराम सिताराम, राकेश दामू, राजेंद्र बाबुराव पाटील, सुदाम सोनवणे, संतोष बैसाणे पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनीही आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमानंतर गावकऱ्यांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जयघोषात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी संपूर्ण उदयनगर परिसर दुमदुमून गेला होता. या मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक, विद्यार्थी व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील तरुण वर्गाने विशेष मेहनत घेतली. भूषण कापडणे, जितू डॉक्टर, मुकेश पाटील, एकनाथ डॉक्टर, भूषण राजेंद्र पाटील, नीलकंठ एकनाथ, अजय पाटील, विवेक पाटील, मयूर पाटील, यश वाघ यांच्यासह सर्व तरुणांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडला. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी राकेश कापडणे, सुभाष पाटील, नित्यानंद वाघ, शुभम वाघ व शुभम सुनील कापडणे यांनीही मोलाचे सहकार्य केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी नीलकंठ एकनाथ पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. एकूणच उदयनगर येथे साजरी करण्यात आलेली शिवजयंती ही केवळ उत्सव न राहता नव्या पिढीला प्रेरणा देणारी, शिवविचार रुजवणारी व सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरली, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!