कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.!!!

कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.!!!
भडगाव ता.प्रतिनिधी: -आमीन पिंजारी
कजगाव (ता. भडगाव, जि. जळगाव): कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सकल मराठा महासंघाच्या मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिवरायांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून शिवरायांचे विचार, शौर्य, स्वराज्याची संकल्पना आणि लोककल्याणकारी प्रशासन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. स्वाभिमान, धैर्य, प्रामाणिकपणा, न्यायप्रियता आणि राष्ट्रप्रेम ही मूल्ये अंगीकारून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जयंतीनिमित्त सर्व समाजबांधवांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
संध्याकाळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या तरुणाईसह लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग मिरवणुकीचे आकर्षण ठरला. परिसरात शिवगर्जना व घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मिरवणूक मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
सकल मराठा महासंघाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला-भगिनी, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



