जमीन गहाण ठेवली, परीक्षेत डमी उमेदवार बसवून पत्नीला सरकारी नोकरी लावली, मात्र महिला म्हणाली बेरोजगार पतीसोबत राहणार नाही
जमीन गहाण ठेवली, परीक्षेत डमी उमेदवार बसवून पत्नीला सरकारी नोकरी लावली, मात्र महिला म्हणाली बेरोजगार पतीसोबत राहणार नाही
राजकुमार रावच्या चित्रपटातील एक गाणे आहे – ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी. या गाण्याचे बोल राजस्थानमधील पती-पत्नीशी मिळते-जुळते आहेत. राज्यातील कोटा जिल्ह्यात राहणाऱ्या मनीषने पत्नी सपना मीना हिच्यावर सरकारी नोकरी मिळाल्यानंतर धोका दिल्याचा आरोप केला आहे.
पतीने म्हटले आहे की, त्याने सपनाच्या शिक्षणाला पाठिंबा दिला तिला आर्थिक मदत केली. आपली फसवणूक झाल्यानंतर त्याने पत्नीच्या वर्तवणुकीचा पर्दाफाश करत तिला नोकरीतून निलंबित करायला लावले आहे.
काय आहे प्रकरण –
राजस्थानमधील एका महिला रेल्वे कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. तिच्या पतीने आरोप केला होता की, तिच्याजागी दुसऱ्याने परीक्षा दिली होती. अधिकाऱ्यांनी या आरोपाची चौकशी सुरू केली आहे. कोटा येथील सोगरिया रेल्वे स्टेशनवर पॉइंटमन म्हणून काम करणारी सपना मीना हिचे पती मनीष मीणा यांच्या तक्रारीनंतर तिला निलंबित करण्यात आले आहे. कोटा विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी सौरभ जैन म्हणाले, ‘या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
जमीन गहाण ठेऊन पत्नीला शिकवले –
मीडिया रिपोर्टसार, मनीषने सांगितले की, त्याने आपल्या पत्नीच्या शिक्षणाची काळजी घेतली आणि तिला रेल्वे भरती परीक्षेची तयारी करण्यास मदत केली. पतीने आरोप केला की, चेतन राम या नातेवाईकाने १५ लाख रुपयांच्या बदल्यात प्रॉक्सी उमेदवाराची व्यवस्था केली होती. त्यासाठी जमीन गहाण ठेवल्याचा दावा मनीषने केला असून राजेंद्र हा रेल्वे कर्मचारी या प्रक्रियेत एजंट म्हणून काम करत होता. लक्ष्मी मीणा असे या प्रॉक्सी उमेदवाराचे नाव असून तिने सपनाच्या जागी परीक्षा दिली आणि सपनाला नोकरी मिळाली.
सहा महिन्यातच पतीला सोडले –
मनीषच्या म्हणण्यानुसार, नोकरी मिळाल्यानंतर सपनाने त्याला सहा महिन्यांतच सोडले. तिने म्हटले की, ती बेरोजगार व्यक्तीसोबत राहू शकत नाही. याबाबत चेतन राम यांना विचारणा केली असता पुन्हा फसवणूक झाली आणि नोकरीसाठी अतिरिक्त नऊ लाख रुपयांची मागणी केली गेली. मात्र नोकरी मिळाली नाही, असा आरोप मनीषने केला. त्यानंतर मनीषने पश्चिम मध्य रेल्वेच्या दक्षता विभाग आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली.
कागदपत्रे जप्त –
अधिकाऱ्यांनी करौली, कोटा आणि अलवर येथे छापे टाकून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. सपनाच्या भरती प्रक्रियेत बनावट फोटो आणि ओळख पत्राचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सीबीआयने सपना आणि कथित प्रॉक्सी उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सुरू केला जात आहे.