ऑपरेशन मुस्कान अंतर्गत २४ तासांत अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध; कासोदा पोलिसांची तत्पर कामगिरी.!!!!
कासोदा प्रतिनिधी :-
जळगाव जिल्ह्यात हरविलेल्या तसेच अपहृत बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्गत कासोदा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत १५ वर्षीय अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मा. पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 0012/2026 भा.न्या.सं. कलम 137 (2) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई-वडिलांना कोणतीही माहिती न देता, रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या पथकाने घटनेची तात्काळ दखल घेत व्यापक शोध मोहीम हाती घेतली.
शोध मोहिमेदरम्यान मुलीच्या गावापासून ते विविध पोलीस स्टेशन हद्दीतील रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. तसेच जवळच्या सर्व पोलीस ठाण्यांना तातडीने सूचना देऊन शोधात सहभागी करून घेण्यात आले.
दरम्यान, मुलीच्या शरीरबांधणी व वर्णनानुसार चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीत पायी दिंडीमध्ये तिच्यासारखी दिसणारी एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. याबाबत माहिती मिळताच कासोदा पोलिसांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेतली.
त्यानंतर संयुक्त शोध पथकात
सपोनि श्रीकांत पाटील, पोउनि धर्मराज पाटील, पोहेका नंदलाल परदेशी, पोहेका नितीन सूर्यवंशी, पोना किरण गाडीलोहार, पोना प्रदीप पाटील, पोका योगेश गो. पाटील व पोका स्वप्निल परदेशी
यांचा समावेश करून प्रत्यक्ष घटनास्थळी तपास करण्यात आला.
तपासाअंती सदर मुलगी ही हरविलेलीच असल्याची खात्री झाल्यानंतर तिला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन कासोदा पोलीस स्टेशनच्या अंमलदारांनी तिच्या मूळ पालकांच्या स्वाधीन केले. मुलगी सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव विभाग श्री. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांच्या सतर्कता, समन्वय व तत्परतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे सुरक्षित पुनर्मिलन शक्य झाले असून, ही कारवाई पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.






