
तीस हजारांची लाच भोवली;दोन तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात.!!!
एरंडोल प्रतिनिधी :-
वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना उत्राण (ता. एरंडोल) येथील दोन तलाठ्यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. २७) सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या तलाठ्यांमध्ये उत्राण अहिर हद्दचे तलाठी नरेश भास्कर शिरुड (वय ४१, रा. वाघनगर, जळगाव) व उत्राण गुजर हद्दचे तलाठी शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६, रा. हरिओम नगर, नाशिक, मूळ रा. पहूर पेठ, ता. जामनेर) यांचा समावेश आहे.
तक्रारदार वाळू वाहतूक व्यवसाय करतात. मंगळवारी (दि. २७ जानेवारी) उत्राण येथील गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करत असताना त्यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर तलाठी नरेश शिरुड यांनी पकडले. त्यानंतर कारवाई न करण्याच्या बदल्यात शिरुड यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.
एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शिरुड यांनी, “इतरांकडून जास्त पैसे घेतो, मात्र तू गरीब असल्याने ३० हजार रुपये दे,” असे सांगून लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. यावेळी तलाठी शिवाजी घोलप यांनीही लाच मागणीला प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले.
मंगळवारी सायंकाळी उत्राण येथील ग्रामपंचायत कार्यालयातील एका खोलीत दोन्ही तलाठी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना जळगाव एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.
कारवाईदरम्यान आरोपी नरेश शिरुड यांच्या ताब्यातून १ लाख ७३ हजार ३०० रुपये रोख, २ हजार ९५० रुपये किमतीची महागडी मद्याची बाटली तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, अंमलदार प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे



