

नगरदेवळा प्रतिनिधी :-
दि. ०२ फेब्रुवारी २०२६ : नगरदेवळा शहरात खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त सोमवारचा बाजार भरलेला होता. यात्रेसाठी आणि बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत किंवा गर्दीत भरकटल्यामुळे शुभम पवार (रा. बाहेरगाव) या चष्मे विक्रेत्याची अल्पवयीन मुलगी सायंकाळी सुमारे ६:०० वाजेच्या सुमारास बेपत्ता झाली. अचानक मुलगी दिसेनाशी झाल्याने कुटुंबीयांमध्ये एकच घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच नगरदेवळा पोलीस ठाण्याचे पीएसआय योगेश गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निवृत्ती मोरे, सहाय्यक पोलीस हवालदार हरीश अहिरे, कॉन्स्टेबल दिनेश पाटील व कॉन्स्टेबल मजीद पठाण यांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. बाजारपेठ, बसस्थानक परिसर, यात्रास्थळ, मंदिर परिसर तसेच प्रमुख चौकात तपास पथके पाठवण्यात आली. दुकानदार, फेरीवाले व नागरिकांकडून माहिती घेत कसून तपास करण्यात आला.
अवघ्या काही तासांतच पोलिसांना यश आले. हरवलेली मुलगी सुरक्षितपणे सापडून तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले व चौकशीअंती तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द करण्यात आले. मुलगी सुरक्षित सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकत नगरदेवळा पोलिसांचे आभार मानले.
या तत्पर, संवेदनशील आणि जबाबदार कामगिरीमुळे नगरदेवळा पोलीस दलाबद्दल नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे. विशेषतः सण, उत्सव, यात्रा व गर्दीच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखणे तसेच हरवलेल्या व्यक्तींचा तातडीने शोध घेणे ही जबाबदारी नगरदेवळा पोलीस दल अत्यंत चोखपणे पार पाडत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
तसेच, पाचोरा पोलीस दलही आपल्या शौर्य, तत्परता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी वृत्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यात नावाजले जात असून, अशा अनेक उल्लेखनीय कामगिरींमुळे पोलिसांबद्दल सकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे.



