आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ऊर्जा दीदी’; ग्रामीण महिलांच्या हातून सौरऊर्जेचा विस्तार
पाचोरा–भडगाव तालुक्यात घराघरावर सौरऊर्जेचा उजेड
पाचोरा भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा व भडगाव तालुक्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘ऊर्जा दीदी’ या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागात सौरऊर्जेचा प्रसार वेगाने होत असून महिलांना रोजगार, स्वावलंबन व सामाजिक सन्मान मिळत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
रूट (ROOT) कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या ऊर्जा दीदी घराघरात जाऊन सौरऊर्जेबाबत जनजागृती करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठल पाटील यांच्या घरी सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या बसविण्यात आला. काही दिवसांपूर्वी तांत्रिक पथकातील तंत्रज्ञ अजय यांनी ऊर्जा दीदींसह विठ्ठल यांच्या घराच्या छताची पाहणी केली. छताची मजबुती, सावलीची अडचण व तांत्रिक बाबी तपासून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.
यानंतर ऊर्जा दीदींनी विठ्ठल यांच्या पत्नी लक्ष्मी यांना सौर सिस्टिमचा खर्च, शासनाकडून मिळणारी सबसिडी, बँक कर्जाची सोपी प्रक्रिया तसेच भविष्यात वीजबिलात होणारी मोठी बचत याबाबत सविस्तर माहिती दिली. सर्व बाबी समजून घेतल्यानंतर ही गुंतवणूक घरासाठी फायदेशीर असल्याची खात्री पटल्याने विठ्ठल व लक्ष्मी यांनी सोलर सिस्टिमची ऑर्डर निश्चित केली.
संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने करण्यात आला. पेमेंट केल्यानंतर अधिकृत पावती देण्यात आली. ऊर्जा दीदींच्या प्रामाणिक व विश्वासार्ह कार्यपद्धतीमुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होत आहे.
काही दिवसांतच विठ्ठल यांच्या घरासाठी लागणारे सौर पॅनल व इतर साहित्य घेऊन मोठा ट्रक गावात दाखल झाला. राहुल या डिलिव्हरी कर्मचाऱ्याने साहित्य उतरवले. ऊर्जा दीदी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक साहित्याची तपासणी करून खात्री करून घेतली.
त्यानंतर इन्स्टॉलेशनचे काम सुरू झाले.अजय व त्यांच्या पथकाने सर्व सुरक्षा नियम पाळत हेल्मेट व सेफ्टी बेल्टचा वापर करून छतावर सौर पॅनल बसवले. ऊर्जा दीदी खाली उभी राहून संपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून होत्या. सर्व जोडण्या पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी यांना मुख्य स्विच सुरू करण्यास सांगण्यात आले. स्विच ऑन होताच घरात सौरऊर्जेवर वीजपुरवठा सुरू झाला. त्या क्षणी लक्ष्मी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.
काम पूर्ण झाल्यानंतर ऊर्जा दीदींनी पॅनलची स्वच्छता, देखभाल व काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी आपला मोबाईल क्रमांकही दिला.
दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ‘ऊर्जा दीदी’ उपक्रमाबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की,“महिला सक्षमीकरण केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवायचे आहे. महिलांना रोजगार, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास मिळाल्यास त्या स्वतःचा व समाजाचा विकास करू शकतात. पाचोरा–भडगाव तालुक्यातील प्रत्येक घरावर सौरऊर्जा पोहोचवणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.”
या उपक्रमासाठी संपुर्ण सोलराईज प्रा. लि. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.प्रशांत जाधव तसेच ॲड.दिपक बोरसे पाटील, श्री.विशाल सावकारे ,सौ. कामिनी पाटील यांनी ROOT (मूळ), ऊर्जा दीदी योजने संबंधी संकल्पना मांडली आणि तांत्रिक माहिती दिली त्यासाठी श्री. मयूर पाटील,संदीप पाटील,धीरज पाटील, चेतन पाटील,.विवेक बडगुजर,जमाल एस कासार ,आकाश कोळी यांनी सहकार्य केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना नवे उत्पन्नाचे साधन मिळत असून स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढत आहे. ऊर्जा दीदींनी ग्रामीण महिलाही तंत्रज्ञानाच्या मदतीने घराघरात उजेड निर्माण करू शकतात, हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.
