भडगावमध्ये महिलाराज्याचा ऐतिहासिक अध्याय”नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांच्या पदग्रहण सोहळ्यात महिला सशक्तीकरणाचा ठाम निर्धार.!!!
भडगाव |प्रतिनिधी :-
भडगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांच्या पदग्रहण सोहळ्याने भडगावच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय रचला. सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पूर्णतः महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता आणि कोणत्याही पुरुषांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.
या सोहळ्यास आमदार किशोर आप्पा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब जिभाऊ पाटील, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, नगरसेवक-नगरसेविका, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार उपस्थित होते.
महिलांचे नेतृत्व – भडगाव व पाचोर्यात महिलाराज्य
यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा यांनी सांगितले की, पाचोरा व भडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये महिलाच नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या असून हा महिलांच्या सामाजिक व राजकीय सशक्तीकरणाचा मोठा विजय आहे.
“जर सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा उघडली नसती, तर आज महिला नगरसेविका आणि नगराध्यक्ष दिसल्या नसत्या,” असे त्यांनी नमूद केले.
महिला बचत गटांसाठी शाश्वत उत्पन्नावर भर
महिला बचत गटांच्या कार्याबाबत बोलताना आमदार किशोर आप्पा म्हणाले की, वडे-पापड, शेवया, मसाले यांसारखे उद्योग महत्त्वाचे असले तरी त्यापुरते मर्यादित न राहता महिलांना दरमहा किमान १० ते १५ हजार रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळेल असे नवे रोजगार मॉडेल उभे करणे आवश्यक आहे.
जळगाव येथे महिला बचत गटांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘खाऊ गल्ली’ उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी भडगावमध्येही महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली.
‘ऊर्जा दीदी’ उपक्रमातून रोजगार
महिलांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऊर्जा दीदी’ उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवण्याच्या कामात महिलांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे २ लाख रुपयांचे कर्ज बँकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून शासनाकडून सुमारे ७० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. उर्वरित कामातून महिला बचत गटांना थेट उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘लखपती दीदी’ घडवण्याचा संकल्प
“प्रत्येक महिला बचत गट आणि प्रत्येक दीदी लखपती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार आमदार किशोर आप्पा यांनी व्यक्त केला. महिलांमध्ये काम करण्याची तयारी, कष्टाची तयारी आणि आत्मविश्वास असल्यास त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे अशक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भडगावकर जनतेचे अभिनंदन
या निवडणुकीत जाती-धर्माच्या राजकारणाला नकार देत विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करणाऱ्या भडगावकर जनतेचे आमदार किशोर आप्पा यांनी विशेष अभिनंदन केले.
“झोपडीत राहणाऱ्या एका सामान्य महिलेला भडगाव शहराच्या नगराध्यक्षपदी बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय जनतेने घेतला आहे,” असे ते म्हणाले.
विकासाची ग्वाही
नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील व सर्व नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पारदर्शक, प्रामाणिक व विकासाभिमुख कारभार करण्याची ग्वाही दिली.
या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्यामुळे भडगावमध्ये महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळाली असून महिला सशक्तीकरणाचा संदेश संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोहोचला आहे.
