पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीता ताई पाटील यांचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवत लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील यांच्या पदग्रहणाचा भव्य व ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, पाचोरा–भडगावचे आमदार ना. किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख ललिता ताई पाटील, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, गटनेते सुमित पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत जनतेच्या विश्वासावर ऐतिहासिक विजय मिळवला. विविध पक्षांनी एकत्र येऊनही आमदार किशोर आप्पा पाटील यांना रोखण्यात अपयश आले. शिवसेनेला पाचोरा नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळाल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले, “हा विजय दादागिरीचा किंवा सत्तेच्या मस्तीचा नसून विकास, विश्वास आणि शांततेचा विजय आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात अशी कामगिरी करावी की पुढील निवडणुकीत नागरिक स्वतः त्या नगरसेवकाची मागणी करतील.” त्यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत महिला बचत गटांसाठी ‘ऊर्जा दीदी’ सौरऊर्जा प्रकल्पाची माहिती दिली.
लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. “या विजयामध्ये ८० टक्के योगदान महिलांचे आहे,” असे सांगत त्यांनी पाचोरा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. “पाचोरा शहराला मुबलक आणि शुद्ध पाणी देणारी नगराध्यक्ष म्हणून ओळख निर्माण करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या विजयाचे अभिनंदन करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “राज्य शासनाच्या माध्यमातून पाचोरा शहरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या पदग्रहण सोहळ्यात महिला बचत गटांसाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार व आर्थिक स्वावलंबनाच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बँक कर्ज, शासकीय अनुदान व प्रत्यक्ष कामाच्या संधी उपलब्ध करून महिलांना सक्षम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता-भगिनी, शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर शिवसेनेच्या घोषणांनी व जल्लोषाने दुमदुमून गेला. पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात हा पदग्रहण सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
