शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील भडगाव नगरपालिकेचे गटनेते.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ऐतिहासिक विजयामागे प्रभावी निवडणूक व्यवस्थापन, अचूक रणनीती आणि मजबूत संघटन कौशल्य महत्त्वाचे ठरले असून, त्यात नगरसेवक लखीचंद पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.
निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण नियोजन, उमेदवारांचा समन्वय, प्रचार यंत्रणेची आखणी तसेच कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम लखीचंद पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. याचा थेट लाभ शिंदे सेनेला मिळाला असून नगराध्यक्ष रेखा मालचे यांच्यासह पक्षाचे बहुसंख्य नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे भडगाव नगरपालिकेत शिवसेनेने ऐतिहासिक विजय नोंदविला आहे.
भडगाव शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत लखीचंद पाटील यांनी एक सकारात्मक व विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. याच जनाधाराचा लाभ पक्षाला निवडणुकीत मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लखीचंद पाटील यांची भडगाव नगरपालिकेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षातील नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नगरपालिकेतील गटनेता हा पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी मानला जातो. पक्षाच्या नगरसेवकांमध्ये समन्वय साधणे, सर्वसाधारण सभा व समित्यांमध्ये पक्षाची भूमिका मांडणे, विकासकामांबाबत धोरण निश्चित करणे, नगराध्यक्ष व प्रशासनाशी समन्वय ठेवणे तसेच नगरसेवकांच्या समस्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या गटनेत्यावर असतात.
गटनेतेपद हे मानाचे तसेच अत्यंत जबाबदारीचे पद असून, आगामी काळात भडगाव नगरपालिकेच्या कारभारात लखीचंद पाटील यांची भूमिका निर्णायक ठरेल आणि शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
