६५ कोटींचा अमली पदार्थ जप्त; श्रीलंकेकडे जाणारी कार चाळीसगावात अडवली.!!!
जळगाव प्रतिनिधी :-
चाळीसगाव पोलिसांनी एक मोठी कारवाई करत तब्बल ६४ कोटी ९८ लाख रुपयांचा अमली पदार्थ (ॲम्फेटामाईन) जप्त केला आहे. श्रीलंकेकडे जात असलेली संशयित कार अडवून चालकाला अटक करण्यात आली. या कारवाईच्या पुढील तपासात तमिळनाडूतील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी नागापट्टम येथे ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई २४ जुलै रोजी रात्री बोढरे फाटा चौकीजवळ करण्यात आली. महामार्ग पोलीस नाकाबंदी दरम्यान तपासणीसाठी थांबवलेली कार (DL 09 CB 7771) तपासली असता, डिक्कीत ठेवलेल्या सूटकेसमधून अमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणात अब्दुल आसिम अब्दुल आला सय्यद (वय ४८, रा. दक्षिण दिल्ली) याला तात्काळ अटक करण्यात आली.
तपास अधिक खोलवर नेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली, बंगळूर, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू येथे चार विशेष पथके पाठविण्यात आली होती. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे २८ जुलै रोजी नागापट्टम येथून महालिंगम नटराजन (वय ६२) या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली. त्याला ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासातून उघड झालेली ड्रग्सची तस्करीची साखळी दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेशमार्गे महाराष्ट्रातील चोपडा-चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगरमार्गे तमिळनाडू आणि तेथून पुढे श्रीलंकेकडे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या यशस्वी कारवाईमध्ये डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक कविता नेरकर, निरीक्षक संदीप पाटील, अमितकुमार मनेळ आणि चाळीसगाव पोलिसांचे विशेष पथक सहभागी होते.