मित्राच्या खुनाचा उलगडा : चार आरोपी 12 तासांत जेरबंद,वारजे माळवाडी पोलिसांची वेगवान कारवाई

मित्राच्या खुनाचा उलगडा : चार आरोपी 12 तासांत जेरबंद,वारजे माळवाडी पोलिसांची वेगवान कारवाई
पुणे प्रतिनिधी :
मित्रानेच साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील चार आरोपींना वारजे माळवाडी पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 27/2026, भा.न्या.सं. कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलीस अंमलदार बाळू गायकवाड व साई कारके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान दोन संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत आहेत.
या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कावडे व पोलीस कर्मचारी पथकासह घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांची चाहूल लागताच संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींची नावे पुढीलप्रमाणे निष्पन्न झाली :
1. शुभम राजेश शिंदे (वय 25)
2. लकी सुरेंद्र सिंग (वय 23)
3. सुनील संतोष खलसे उर्फ एस.के. (वय 19)
4. विधीसंघर्षित बालक
पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपींनी दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान आकाशनगर, शनिमंदिर टेकडी परिसरात आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून राजेंद्र सुभाष एलमगच्चे यांना बोलावून घेतले. त्यानंतर लोखंडी हत्यार, दगड आदींच्या साहाय्याने हल्ला करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला.
सदर कारवाई पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, उपायुक्त श्री. निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहाय्यक निरीक्षक कावडे, तसेच पोलीस अंमलदार गणेश ठगे, निनाद माने, अजित शिंदे, प्रदीप राठोड, दत्तात्रय पवार आदींचा सहभाग होता.सध्या सर्व आरोपी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.



