पाचोरा गोळीबार प्रकरण: आरोपींची जामनेर पोलिस ठाण्यात शरणागती.! गोळीबार करणारे दोघे आरोपी दोन पिस्तुल, दुचाकी व मोबाईलसह पोलिसांच्या ताब्यात.!!!
पाचोरा गोळीबार प्रकरण: आरोपींची जामनेर पोलिस ठाण्यात शरणागती.!
गोळीबार करणारे दोघे आरोपी दोन पिस्तुल, दुचाकी व मोबाईलसह पोलिसांच्या ताब्यात
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा शहरात ४ जुलै रोजी सायंकाळी बसस्थानकाजवळील प्रवेशद्वारासमोर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) याचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेने नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटनेनंतर आरोपी निलेश अनिल सोनवणे (वय २७) व त्याचा अल्पवयीन साथीदार घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, याच रात्री उशिरा दोघांनी थेट जामनेर पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. त्यांनी वापरलेली दोन पिस्तुल, एक दुचाकी व मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले. तसेच, नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहनही केलं.
आरोपींच्या आत्मसमर्पणानंतर या प्रकरणात नवीन धागेदोरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, शहरात यासंदर्भात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
दरम्यान, आरोपी सध्या जामनेर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचं खुलेआम हत्याकांड घडणं ही गंभीर बाब असून, नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाची भूमिका ऐरणीवर आली आहे.