वृद्ध महिलेच्या अपघाती मृत्यूमुळे संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन.!!!
चाळीसगाव प्रतिनिधी :-
दिनांक ४ जुलै रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास ठाकूर वाडी येथील पुष्पाबाई पितांबर ठाकूर (वय अंदाजे ७० वर्षे) या वृद्ध महिलेचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हा अपघात हिरापूर रोडवरील तालुका कृषी कार्यालयाजवळील वळणावर घडला. या ठिकाणी अनेक वेळा मागणी करूनही स्पीड ब्रेकर बसवण्यात न आल्यामुळेच अपघात घडल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी सकाळी संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीव्र रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधत, “आजच तुम्ही सांगाल त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात येतील,” असे ठाम आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, हा गेल्या महिन्यात हिरापूर रोडवरील तिसरा जीवघेणा अपघात असून आतापर्यंत तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी नागरिकांकडून जोरदार मागणी करण्यात येत आहे.