आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे- डॉ. ओमप्रकाश शेटे
महाराष्ट्र डायरी न्युज करिता सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री.राहुल गावडे पाटील
सातारा, दि. १९: आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजना एकत्रित केल्या असून या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५ लाखापर्यंत आरोग्य संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे आष्युमान भारत कार्ड काढण्याच्या दृष्टीने मोहीम स्वरूपात काम करावे, असे निर्देश आयुष्मान भारत- मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा श्री. शेटे यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जास्त जास्त रुग्णालये महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आणावीत, अशा सूचना करुन श्री. शेटे म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांचे प्रस्ताव दाखल होण्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटरची रिक्त पदे तातडीने भरली जातील. स्त्रियांच्या आरोग्याबाबत प्राधान्य द्यावे. कर्करोगाचा आजार झालेल्या कोणत्याही स्त्रीला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ द्यावा. कोणतीही स्त्री ही उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचेही आयुष्मान कार्ड काढून द्यावेत त्यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून शिबीराचे आयोजन करावेत.
१८००२३३२२००/१५५३८८ या टोल फ्री क्रमांकासह ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती रुग्णालयाच्या बाहेर तसेच ग्रामपंचायतीच्या ठिकाणी फलकांच्या माध्यमातून प्रसिद्धी करावी. छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाच्या निधीची व या महाविद्यालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा खरेदीचा प्रस्ताव द्यावा. निधीसाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीदेखील डॉ. शेटे यांनी दिली.