राज्य नाट्य स्पर्धेचा गौरव सोहळा ५ मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात.!!!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आणि २१ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील विजेत्या कलाकार, तंत्रज्ञ व नाट्य संस्थांचा विभागीय पारितोषिक वितरण सोहळा सोमवार, ५ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे पार पडणार असून सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
या कार्यक्रमात प्राथमिक फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाट्य कलाकारांचा, तंत्रज्ञांचा तसेच नाट्य संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. नाट्य क्षेत्रातील नवोदित आणि हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.