मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये ऐतिहासिक वाढ: निवासी व कार्यालयीन व्यवहारांत विक्रमी नोंद
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नाइट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ च्या पहिल्या तिमाहीत मुंबईने निवासी आणि कार्यालयीन रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये ऐतिहासिक वाढ नोंदवली आहे. देशातील सर्वात मोठी निवासी बाजारपेठ म्हणून मुंबईने २४,९३० प्रायमरी सदनिकांच्या विक्रीची नोंद करत वार्षिक ५% वाढ दर्शवली. डेव्हलपर्सनीही या गतीचा लाभ घेत २५,७०६ नवीन सदनिका लाँच केल्या, ज्यामध्ये २% वाढ झाली.
मुंबईने देशभरातील एकूण निवासी विक्रीत २८% योगदान दिले. सरासरी निवासी किमतीत ६% वाढ झाली असून, प्रति चौरस फूट किंमत ८,३६० रुपयांवर पोहोचली. विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या १६६,९१५ वरून १६६,४५४ पर्यंत घटली. “क्वॉर्टर्स टू सेल” मेट्रिक ७.७ वरून ७.१ पर्यंत सुधारला, ज्यामुळे बाजारातील स्थिरता आणि ग्राहकांचा विश्वास अधोरेखित झाला.
मुंबईतील निवासी विक्रीत प्रीमियम सेगमेंटचा हिस्सा वाढताना दिसतो. २० दशलक्ष ते ५० दशलक्ष रुपयांच्या सदनिकांची मागणी ९% वरून १२% पर्यंत वाढली, तर २०० दशलक्ष ते ५०० दशलक्ष श्रेणीत विक्री तब्बल १०८% वाढली.
मुंबईतील कार्यालयीन बाजारपेठेनेही विक्रमी वाढ नोंदवली. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत कार्यालयीन व्यवहारांचे एकूण क्षेत्रफळ ३.५ दशलक्ष चौरस फूटांवर पोहोचले, ज्यामध्ये वार्षिक २४% वाढ झाली. नवीन कार्यालयीन जागांचा पुरवठा ४३% वाढून ०.५ दशलक्ष चौरस फूट झाला. सरासरी भाडे प्रतिमहिना प्रति चौरस फूट ११८ रुपये नोंदवले गेले.
फ्लेक्स ऑफिस स्पेसेसने कार्यालयीन बाजारपेठेत मोठी मजल मारली आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीतील ०.२५ दशलक्ष चौरस फूटांवरून २०२५ मध्ये १.२४ दशलक्ष चौरस फूटांपर्यंत झेप घेत, ३८४% वाढ दर्शवली.
नाइट फ्रँक इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक गुलाम झिया
म्हणाले, “मुंबईच्या निवासी बाजारपेठेला प्रीमियम घरांसाठी वाढती मागणी, तसेच मुंबई कोस्टल रोड व मेट्रो प्रकल्पांचा मोठा फायदा झाला आहे. या पायाभूत सुविधांमुळे शहराची कनेक्टिव्हिटी सुधारली असून, ग्राहक व डेव्हलपर्स दोघांमध्येही आत्मविश्वास वाढत आहे. तसेच, कार्यालयीन बाजारपेठेत विविध कंपन्यांकडून वाढती मागणी आणि मुंबईच्या दीर्घकालीन विकास क्षमतेवर असलेला विश्वास हा मोठा सकारात्मक संकेत आहे.”
मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील ही दमदार कामगिरी पुढील तिमाहीतही कायम राहील, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.