लोक रंगभूमी परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये यावर आंतरविद्याशाखीय परिषद संपन्न.!!!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. भानुबेन महेंद्र नानावटी गृहविज्ञान (सक्षम स्वायत्त) महाविद्यालय यांच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम विभागाच्या सहकार्याने, श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय व ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभाग आयोजित, रूसा प्रायोजित आंतरविद्याशाखीय परिषद ‘लोक रंगभूमी परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये’ या विषयावर आयोजित करण्यात आली.
सदर परिषदेचे उद्घाटन श्रीमती मणिबेन एम. पी. शाह स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की यांनी केले. उद्घाटन प्रसंगी डॉ. पत्की म्हणाल्या, “मला महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा अभिमान वाटतो की त्यांनी अशा प्रकारची परिषद आयोजित करून नवीन पिढीला लोकपरंपरेचे, लोक रंगभूमीचे ज्ञान करून दिले.” तसेच डॉ. पत्की यांनी सेंट जोसेफ महाविद्यालयाचेही कौतुक केले.
परिषदेतील बीजभाषण डॉ. सुनील रामटेके यांनी ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण मांडणीतून उपस्थित संशोधक विद्यार्थ्यांसमोर आणि शोधनिबंध सादरकर्त्यांसमोर लोक रंगभूमीच्या विविध पैलूंचा सविस्तर उलगडा केला. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय रंगभूमी आणि लोकरंगभूमीचा सविस्तर आढावा घेतला. डॉ. रामटेके म्हणाले, “लोक रंगभूमीने आदिवासी, ग्रामीण लोक, संघर्ष करणारे लोक यांच्या दुःख, वेदना, संवेदना अशा अनेक गोष्टी लोकांसमोर मांडल्या जातात.” त्यांनी पुढे सांगितले, “लोक रंगभूमीचा अभ्यास करताना एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता नव्या नव्या पद्धतीने त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.”
डॉ. रामटेके यांनी आपल्या भाषणात तीन महत्त्वाची मुद्दे मांडली: “मानवी जीवनामध्ये कलेचा आस्वाद ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण माणसाला त्याच्या बौद्धिक आणि मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी मनोरंजनाची आवश्यकता असते. लोक रंगभूमी हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी एकरूप झालेला असून, तो सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी निगडित आहे. संशोधन करताना एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता, नव्या नव्या पद्धतीने लोककला आणि रंगभूमीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.”
सदर परिषदेच्या तीन सत्रांमध्ये ३० शोधनिबंध सादर करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. मुकुंद कुळे, डॉ. भटू वाघ आणि डॉ. चिंतामण धिंदळे यांनी सत्राध्यक्ष पद भूषविले.
पहिल्या सत्राचे अध्यक्षपद भुषवणारे डॉ. भटू वाघ म्हणाले, “लोककला आणि लोकपरंपरा ही आपल्या समाजाची जडणघडण आहे; तिचे जतन करणे आणि पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. सर्व लोककला प्रादेशिक भाषांमधून उत्पन्न झाली असून, त्या भाषांचे संवर्धन हे संस्कृतीच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. स्त्री आणि मातृभूमी या दोघांचे सर्जनशील योगदान लोककलेच्या प्रत्येक अंगात प्रकट होते; त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे.”
दुसऱ्या सत्राचे अध्यक्षपद भुषवणारे डॉ. मुकुंद कुळे म्हणाले, “जर लोककलेला समाजात मान, उपजीविका आणि मानवी सन्मान मिळत नसेल, तर ती केवळ नाट्य म्हणून टिकावी लागेल; परंपरेने चालत आलेल्या कला टिकवणे आपले कर्तव्य आहे. लोककला आणि लोकनाट्य ही केवळ मनोरंजन नाही, तर ती समाजाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अधिष्ठान जपण्याचे माध्यम आहे. संस्कृतीची प्रत्येक परंपरा थेट जन्माला येत नाही; आदिवासी, लोकसंस्कृती आणि नागर संस्कृती या तीन स्तरातून ती विकसित होते.”
तिसऱ्या सत्राचे अध्यक्षपद भुषवणारे डॉ. चिंतामण धिंदळे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित संशोधकांना सांगितले, “लोककला ही केवळ मनोरंजन नव्हे, तर ती समाजाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अधिष्ठान जपण्याचे माध्यम आहे, आणि त्याचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे.”
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन रश्मी शेटये तुपे यांनी केले, तर तीन सत्रांचे सूत्रसंचालन जगदीश संसारे आणि माधवी पवार यांनी केले. परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. नेहा भोसले, प्रा. प्रदीप पाटील, डॉ. रेखा शेलार तसेच मराठी विभागाच्या विद्यार्थिनींनी अथक परिश्रम केले.
परिषदेची फलश्रुती म्हणजे ११ विद्यार्थ्यांनी संशोधन करून आपले शोधनिबंध सादर केले. प्रो. डॉ. माला पाडुरंग आणि ग्रंथपाल विद्या मॅडम यांनी परिषदेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
या परिषदेतून विद्यार्थ्यांना लोक रंगभूमी, लोककला आणि सामाजिक मूल्यांचे सखोल अध्ययन करण्याची संधी मिळाली. तसेच परंपरेची जाणीव राखत नव्या दृष्टिकोनातून लोककलेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळाले, जे आगामी पिढीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.