मानवी संवेदनांची उजळण — ‘स्वामी’सोबत कॅन्सरग्रस्तांची दिवाळी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे, तर आशेचा किरण, आपुलकीची ऊब आणि मनाला स्पर्श करणारी मानवतेची अनुभूती. समाजाच्या या विशाल कुटुंबात काही जण आजारपणाच्या सावलीत हरवलेले असतात. त्यांच्यापर्यंत प्रकाशाचा हा उत्सव न्यायचा, हीच भावना मनात बाळगून “स्वामी” संस्थेने यंदाही कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी दिवाळीचा ममतेने उजळलेला उपक्रम राबवला.
परळ येथील भावसार सभागृहात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि परगावातून आलेल्या ३५० कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिवाळी फराळासह साडी, चादर, टॉवेल, बॅग, साबण, तेल, पावडर इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली आकर्षक प्रवासी बॅग प्रेमाने प्रदान करण्यात आली. उपचारांनी थकलेल्या चेहऱ्यावर ‘स्वामी’च्या स्वयंसेवकांनी केलेल्या प्रेमळ स्वागताने आशेचे तेजस्वी हसू उमटताना दिसत होते—हा क्षणच या दिवाळीचा खरा सोहळा होता.
या कार्यक्रमाला शरद डिचोलकर – माजी अध्यक्ष, फेस्कॉम मुंबई, राजूभाई – समाजसेवक, बाबुभाई सोळंकी – उद्योजक, चारुहास हंबीरे – पदाधिकारी, कोळी समाज, शरद अभंग – अध्यक्ष, सावतामाळी भवन यांच्यासह ‘स्वामी’चे अध्यक्ष सुरेश लाड, उपाध्यक्ष वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष मोहन कटारे, सचिव गोविंद राणे, खजिनदार उल्हास हरमळकर आणि विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
रुग्णांमध्ये आनंदाची लहर निर्माण करण्यासाठी ‘विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्रा’ तर्फे सुगम संगीताचा मनोहारी कार्यक्रम सादर करण्यात आला. या सांगीतिक सोहळ्याचे संयोजन विमल माळवदे, प्रतिभा सावंत आणि प्रदीप ढगे यांनी केले, तर अनिल तावडे यांच्या रसाळ आणि जिवंत सूत्रसंचालनाने उत्सव अधिक रंगतदार झाला. दत्ताराम घाडी, नंदकुमार आरोंदेकर, राजरत्न कदम, दिलीप मेस्त्री, शैलेश तुम्मा, शिवाजी गावकर यांनी वाद्यवृंदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. शुभदा मोरे, शैलजा काळे, वंदना भाटवडेकर, सुनिता पारकर, स्वाती मयेकर, गणेश करलकर, जगदीश काळे, कांतीलाल परमार, रमेश सावंत, दशरथ खमितकर आणि नंदकिशोर भुर्के यांच्या सुरेल गायनाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
सभागृहाच्या प्रवेशद्वारावर ममता खेडेकर आणि प्रतिभा सपकाळे यांनी साकारलेली भव्य रांगोळी स्वागताच्या उबदार भावनेचे प्रतीक ठरली. मुख्य कार्यक्रमाचे नेमके निवेदन गुरुदत्त वाकदेकर यांनी प्रभावी शैलीत केले.
रुग्ण नोंदणीचे कार्य सुमंगल गुरव, कार्तिक बैकर, सिध्दी परब आणि नम्रता पडवळ यांनी दक्षतेने सांभाळले. संपूर्ण व्यवस्थापनात गोविंद राणे, नितीन तांबे, विलास पाटील, विष्णू मनियार, तोंडवलेकर, रचना खुळे, प्रतिभा सपकाळे, प्रियांका गायकर, लखबीर कौर, सुरेखा निमकर आणि सोळंकी मावशी यांचे मोलाचे योगदान होते.
या दिवाळी उपक्रमाच्या यशासाठी अध्यक्ष – सुरेश लाड, उपाध्यक्ष – वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष – मोहन कटारे, सचिव – गोविंद राणे, खजिनदार – उल्हास हरमळकर, विश्वस्त – रचना खुळे, प्रतिभा सावंत, गीता नाडकर्णी यांसह विविध प्रकल्प प्रमुखांनी अथक प्रयत्न केले. मातृपक्ष: विमल माळोदे, प्रतिभा सपकाळे, रुग्ण साहाय्य केंद्र: नितीन तांबे, शिवाजी गावकर, विलास पाटील, दिवाळी धमाका: स्वाती मयेकर, ममता खेडेकर, पॅथॉलॉजी: रश्मी नाईक, विद्यार्थी सहाय्य योजना: गीता नाडकर्णी, नीलम सावंत, अवयव दान: अनिल तावडे, हिरेश चौधरी — यांनी परिश्रमांची पराकाष्ठा करून दिवाळीचा हा उत्सव ‘मानवी करुणेचा दीपोत्सव’ ठरवला.
ही दिवाळी केवळ फटाक्यांच्या आवाजात नव्हे, तर माणुसकीच्या स्पर्शात, करुणेच्या उजेडात आणि आशेच्या नाजूक ज्योतीत उजळली. ‘स्वामी’च्या या प्रयत्नांनी केवळ दिवे नव्हे, तर मनं उजळली.