सोन्याच्या दरात अचानक घसरण का.? लोक का विकतायत सोने.?
सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड तेजी दिसून येत होती. दररोज सोन्याचा दर नवनवा उच्चांक गाठताना दिसून येत होता. पण उच्चांकी दर गाठलेल्या सोन्याच्या दरात अचानक घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे.
सोन्याच्या दरात अचानक 3 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 2025 या वर्षात सोन्या्चया दरात 15.6 टक्क्यांनी वाढ झाली त्यानंतर आता अचानक घसरण सुरू झाली आहे. पण सोन्याच्या दरात घसरण होण्यामागची नेमकी कारणे काय आहेत? जाणून घेऊयात..
जागतिक बाजारपेठेत तीव्र घसरण आणि वाढत्या व्यापार युद्धामुळे मंदीची भीती वाढली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सोने विकण्यास सुरुवात केली आहे. परिणामी गेल्या आठवड्याभरापासून सोन्याच्या किमतीत सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (4 एप्रिल) भारतीय बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
तज्ज्ञांचे मत काय.?
गोल्ड एक लिक्विड अॅसेट आहे. त्यामुळेच मार्जिन कॉल्स पूर्ण करण्यासाठी विक्री केली जाते. म्हणून जेव्हा एखादी मोठी जोखीम घटना घडते तेव्हा सोन्याच्या किमतीत घसरण होणे ही सामान्य गोष्ट आहे. ऐतिहासिक ट्रेंडनुसार सोन्यात सुरू झालेल्या या घसरणीत नवे असे काहीही नाहीये असं मत स्टँडर्ड चार्टर्डच्या विश्लेषक सुकी कपूर म्हणाल्याचं वृत्त मनी कंट्रोलने दिलं आहे.
सिटी इंडेक्सचे वरिष्ठ विश्लेषक मॅट सिम्पसन यांच्या मते, इतक्या अस्थिरतेनंतरही सोने हे गुंतवणुकदारांसाठी एक सुरक्षित स्थान आहे. म्हणजेच सोन्याच्या किमतीत होणारी घसरण तात्काळ आहे. तसेच भविष्यात पुन्हा सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते.
अमेरिकेत मंदी येणार?
फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले नवे टॅरिफ दर हे अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. परिणामी महागाई वाढेल आणि विकास दर मंदावण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याने सोन्यापेक्षा जागतिक शेअर बाजारांवर याचा अधिक परिणाम दिसून आला. एस अँड पी 500 आणि नॅस्डॅक कंपोझिटचे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांनी घसरले. याचे मुख्य कारण म्हणजे चीनने 10 एप्रिलपासून सर्व अमेरिकन वस्तूंवर 34 % कर लादण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या टॅरिफ दराला चीनने दिलेला हा प्रत्युत्तर आहे.