IMG 20260727 WA0929

सलग दोन राष्ट्रीय सुवर्णपदकांची कमाई; साध्वी चौधरीची SAI प्रशिक्षणासाठी निवड गोपीचंद पुना पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

55 / 100 SEO Score

सलग दोन राष्ट्रीय सुवर्णपदकांची कमाई; साध्वी चौधरीची SAI प्रशिक्षणासाठी निवड

गोपीचंद पुना पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

भडगाव (प्रतिनिधी) :-

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित “गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव” येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी तथा किसान स्पोर्ट्स अकॅडमीची राष्ट्रीय वेटलिफ्टिंगपटू “कु. साध्वी मीनाक्षी प्रल्हाद चौधरी” हिची भारतीय खेळ प्राधिकरण (Sports Authority of India – SAI) तर्फे छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. सलग दोन वर्षे राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्यानंतर मिळालेली ही संधी तिच्या क्रीडा कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

कु. साध्वीने इंफाळ (मणिपूर) येथे पार पडलेल्या ६८व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तसेच इटानगर येथे झालेल्या ६९व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकत महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर उंचावला.यानंतर नुकत्याच झालेल्या वेटलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतही तिने कांस्यपदकाची कमाई करून सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.

राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय यशाची दखल घेत भारतीय खेळ प्राधिकरणाने (SAI) छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील भारतीय खेळ प्राधिकरण प्रशिक्षण केंद्रात तिची निवड केली आहे. येथे तिला अत्याधुनिक सुविधा, अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असून भविष्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.

साध्वीच्या यशामागे शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील दळवी, पैलवान प्रल्हाद चौधरी, मीनाक्षी चौधरी, राष्ट्रीय कुस्तीपटू स्वराज चौधरी, आदर्श क्रीडा शिक्षक तथा पर्यवेक्षक बी. डी. साळुंखे, प्रा. रघुनाथ पाटील तसेच राष्ट्रीय खो-खो पंच प्रा. प्रेमचंद चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

साध्वीच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा तथा जळगाव जिल्हा दूध फेडरेशन संचालिका डॉ. पुनमताई पाटील, मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील, प्राचार्य आर. आर. वळखंडे, पर्यवेक्षक बी. डी. साळुंखे, प्रभारी कार्यवाहक एम. ए. पवार तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण यश, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय खेळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षणासाठी झालेली साध्वीची निवड ही गोपीचंद पुना पाटील विद्यालय, किसान स्पोर्ट्स अकॅडमी, भडगाव तालुका आणि जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top