IMG 20260727 WA1795

भडगाव पंचायत समितीच्या आढावा बैठकीत तक्रारींचा स्फोट.!!!

54 / 100 SEO Score

भडगाव पंचायत समितीच्या आढावा बैठकीत तक्रारींचा स्फोट.!!!

ग्रामसेवकांच्या मनमानीवर संताप; अपूर्ण पाणी योजना, ‘पोखरा’ व गोठा शेडपासून शेतकरी वंचित

कनाशी ग्रामसेवकावर कारवाईची मागणी, पथराड तलाठ्याच्या बदलीचा ठराव; प्रशासनाला आमदार किशोर पाटील यांचे खडे बोल

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत नागरिकांच्या प्रश्नांचा अक्षरशः स्फोट झाला. तालुक्यातील विविध गावांमधील विकासकामे रखडणे, ग्रामसेवकांची मनमानी, महसूल विभागाचा हलगर्जीपणा, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, जन्म-मृत्यू दाखल्यांतील विलंब तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारींनी बैठकीचे वातावरण चांगलेच तापले.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी, सरपंच आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत रखडलेल्या कामांचा हिशेब मागितला. अनेक गावांतील गंभीर प्रश्न मांडण्यात आल्याने संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

४५ लाखांचा निधी पडून, विकास मात्र ठप्प!

कनाशी ग्रामपंचायतीकडे तब्बल ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही विकासकामे होत नसल्याचा गंभीर मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. संबंधित ग्रामसेवक नागरिकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाई व बदलीची जोरदार मागणी करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेत योग्य कारवाईचे आश्वासन दिले.

डार्क झोन’चा फटका; शेतकरी योजनांपासून वंचित

वाडे गाव डार्क झोनमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना गोठा शेड आणि ‘पोखरा’ योजनेचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. शासनाच्या महत्त्वाच्या योजनांपासून पात्र लाभार्थी वंचित राहत असल्याने यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.

पाणीपुरवठा योजना रखडली; ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी

पांढरद येथील पाणीपुरवठा योजनेचे काम मुदत संपूनही पूर्ण झाले नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. संबंधित ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करून काम पूर्ण करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

ग्रामसेवकावर हलगर्जीपणाचा आरोप; बदलीचा ठराव

पथराड येथील पिक नुकसानीच्या पंचनाम्यांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप तलाठी व्ही. पी. शिंदे यांच्यावर करण्यात आला. ग्रामपंचायतीने त्यांच्या बदलीचा ठराव संमत केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच गावात कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्यामुळे अनेक प्रशासकीय कामे रखडत असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.

जन्म-मृत्यू दाखल्यांचा विलंब, महिला व बालविकास विभागावरही प्रश्नचिन्ह

कजगाव येथे जन्मनोंदणी वेळेत होत नसल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. अनेक गावांमध्ये मृत्यू दाखले उशिरा मिळत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. महिला व बालविकास विभागाच्या कामकाजावरही बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई अटळ’

बैठकीत विविध शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरपरिषद गटनेते लखीचंद पाटील, तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, भैय्यासाहेब पाटील, संजय पाटील, समाधान पाटील, सुपडू खेडकर, सोमनाथ पाटील बोदर्डे, नगरसेवक इम्रानअली सैय्यद विजयकुमार भोसले, जग्गू भोई, संतोष महाजन,अलीम शाह , सौरभ देशमुख, जगदीश पाटील सौरभ पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top