Home Blog

राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी.!!!

राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली तसेच सांगली जिल्हा थायबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग क्रीडा स्पर्धा २०२५–२६ चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. १६ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान स्नेह मेळावा अंतर्गत श्री लक्ष्मणरावजी सैनिक पॅटर्न स्कूल व ज्युनियर कॉलेज, मग्रेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

या राज्यस्तरीय स्पर्धेत भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवत पदकांची लक्षणीय कमाई केली. विविध वजनगटांमध्ये खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक राज्य पातळीवर वाढला आहे.

भडगाव येथील तनवीर रझाक मण्यार (१९ वर्षांखालील, ४४ ते ४८ किलो) यांनी दमदार खेळ करत रौप्य पदक पटकावले. ते श्री साई समर्थ कला व ज्युनियर कॉलेज, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.

त्याचप्रमाणे प्रतीक सतीश दाभाडे (१९ वर्षांखालील, +७५ किलो) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कास्य पदक मिळवले. ते सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.

जुनेद खान शाकीर खान (१४ वर्षांखालील, ३६ ते ४० किलो) यांनी संघर्षपूर्ण लढतीत कास्य पदक पटकावले. ते वाय. एम. खान उर्दू स्कूल, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.

आर्यन जुलाल सोनवणे (१४ वर्षांखालील, ४० ते ४४ किलो) यांनी आपल्या तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर रौप्य पदक जिंकले. ते न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.

चाळीसगाव येथील फैजान अकरम शेख (१९ वर्षांखालील, ६० ते ६५ किलो) यांनी कास्य पदक पटकावत चाळीसगावचा नावलौकिक वाढवला. तसेच ओम गौतम भोयर (१७ वर्षांखालील, ५२ ते ५६ किलो) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले. हे दोन्ही खेळाडू के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेज, चाळीसगाव येथील विद्यार्थी आहेत. याशिवाय आर्यन निलेश ब्राह्मणकर यांनीही स्पर्धेत सहभाग नोंदवत अनुभव मिळवला.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अबरार खान (सहसचिव, थाय बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्राचे कोच शाहरुख नजीर मण्यार यांनी तांत्रिक मार्गदर्शन करून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. स्पर्धेतील पंचगणनेत आयन खान, चाळीसगाव यांनी जबाबदारी पार पाडत योगदान दिले.

या यशाबद्दल जळगाव जिल्हा थाय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी, उपाध्यक्ष शाम पाटील तसेच पदाधिकारी डॉ. वसीम मिर्झा, सौरभ पाटील, संतोष पाटील, सौरभ देशमुख, अजगर खान, हाजी खलील शेख यांनी खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश आगामी काळात अधिक खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार असून परिसरातील क्रीडा चळवळीला नवी दिशा देणारे ठरले आहे.

पाचोरा येथे ‘अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृह’चे भव्य उद्घाटन.!!!

पाचोरा येथे ‘अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृह’चे भव्य उद्घाटन.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा शहर व तालुक्यातील महिलांसाठी व कुटुंबीयांसाठी विश्वासाचे केंद्र ठरलेले अंकुर हॉस्पिटल व प्रसूतिगृह आता नव्या, सुसज्ज व अत्याधुनिक वास्तूत स्थलांतरित होत असून, सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महाराणा प्रताप चौक परिसरात उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधा, वातानुकूलित ऑपरेशन थिएटर व २४ तास सेवा यांमुळे हे हॉस्पिटल पाचोरा तालुका व परिसरातील आरोग्यसेवेसाठी नवे पर्व ठरणार आहे.

अंकुर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांची नोंदणी व नियमित तपासणी, सुलभ व वेदनारहित प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा, दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) शस्त्रक्रिया, गर्भाशय विकारांचे निदान व उपचार, पाळीविषयक विकार, स्त्रीरोग तपासणी व उपचार, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया व साधने तसेच लैंगिक समस्यांचे निदान व निवारण अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच मूलबाळ न होण्याच्या (वंध्यत्व) समस्यांवर तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचाराची सुविधाही देण्यात येणार आहे.

नव्या इमारतीत अत्याधुनिक व वातानुकूलित ऑपरेशन थिएटर, स्पेशल वातानुकूलित रूम्स, डिलक्स रूम्स, २४ तास लिफ्ट व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णांच्या सोयीसाठी २४ तास कार्यरत फार्मसी व पॅथॉलॉजी लॅबही उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णांची सुरक्षितता, स्वच्छता व तत्काळ उपचार यावर विशेष भर देण्यात आला आहे.

हॉस्पिटलचे उद्घाटन आण्णासाहेब डॉ. के. बी. पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील भूषविणार आहेत. ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन मा. अमोलदादा विमणराव पाटील यांच्या हस्ते, डॉक्टर केबिनचे उद्घाटन श्री. संतोष देवचंद पाटील व सौ. शालिनीबाई संतोष पाटील यांच्या हस्ते, तर प्रशासन केबिनचे उद्घाटन सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक व राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या भव्य प्रकल्पासाठी पाचोरा-भडगाव डॉक्टर असोसिएशन, रोटरी क्लब पाचोरा, केमिस्ट व पॅरामेडिकल असोसिएशन, पॅथॉलॉजी लॅब असोसिएशन, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच मित्रपरिवार व नातेवाईकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच आर्किटेक्ट, सिव्हिल, इलेक्ट्रिकल व इंटेरियर तज्ज्ञांसह सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

नव्या वास्तूत स्थलांतरानिमित्त तिर्थप्रसाद व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन डॉ. किशोर संतोष पाटील व सौ. प्रियंका किशोर पाटील यांनी केले आहे. पाचोरा तालुक्यातील महिलांच्या आरोग्यसेवेसाठी ‘अंकुर हॉस्पिटल’चा हा नवा टप्पा निश्चितच मोलाचा ठरणार आहे.

पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचा भव्य सत्कार

पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचा भव्य सत्कार

आरोग्य क्षेत्रातील प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; आमदार किशोर (अप्पासाहेब) पाटील यांचे लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा शहरातील वैद्यकीय क्षेत्र व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ताईसो. सौ. सुनीताताई पाटील व उपनगराध्यक्ष मा. किशोर बारावकर यांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी पाचोरा येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा विकासाचे कार्यसम्राट मा. किशोर (अप्पासाहेब) पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवनिर्वाचित नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी टाळ्यांच्या गजरात नव्या नेतृत्वाचे अभिनंदन केले.

डॉक्टर्स असोसिएशनची लक्षणीय उपस्थिती

या सत्कार समारंभास पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये

डॉ. जीवन पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. भरत पाटील, डॉ. झाकीर देशमुख, डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. दिनेश सोनार, डॉ. विजय जाधव, डॉ. अतुल पाटील, डॉ. चंद्रकांत विसपुते, डॉ. राहुल पटवारी, डॉ. नंदकिशोर पिंगळे, डॉ. मुकेश तेली, डॉ. कुणाल पाटील, डॉ. बालकृष्ण पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. चेतन राजपूत, डॉ. किरण राजपूत, डॉ. प्रशांत शेळके, डॉ. दीपक चौधरी, डॉ. व्येंकटेश जोशी यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या विविध प्रलंबित मागण्या व शहरातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर आमदार किशोर (अप्पासाहेब) पाटील यांच्याशी सखोल चर्चा करण्यात आली. शहरातील आरोग्य सुविधा, वैद्यकीय व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, नागरी सुविधा, स्वच्छता, रस्ते व आपत्कालीन आरोग्य सेवा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी डॉक्टरांच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत, संबंधित विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन दिले. पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असून प्रशासन व वैद्यकीय क्षेत्र यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा ताईसो. सौ. सुनीताताई पाटील व उपनगराध्यक्ष मा. किशोर बारावकर यांनी सत्काराला उत्तर देताना पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी आरोग्य, स्वच्छता व मूलभूत सुविधा या विषयांना प्राधान्य दिले जाईल, तसेच डॉक्टरांच्या सहकार्याने पाचोरा शहर अधिक सक्षम व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण कार्यक्रम सौहार्दपूर्ण व उत्साही वातावरणात पार पडला. शहरातील विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व डॉक्टर यांचा समन्वय अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मोडी लिपी मोफत प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात प्रारंभ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी संस्कृतीचा अभिमान मानल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या मोडी लिपीच्या संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी “श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल” आणि “शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोडी लिपी – मोफत शिकवणी वर्गाचा १८ जानेवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. मोडी लिपीचा प्रसार व्हावा आणि तिचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे प्रशिक्षण शिबिर एकूण १० रविवार चालणार असून दर रविवारी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वर्ग घेतले जाणार आहेत. शिबिराच्या पहिल्याच दिवशी विविध वयोगटांतील मोडी लिपीप्रेमी, इतिहास अभ्यासक तसेच नवशिक्या प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे वर्ग डॉक्टर गायकवाड‘स इन्स्टिट्यूट, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहेत.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये मोडी लिपीची मूलभूत ओळख, अक्षररचना व लेखनपद्धती, प्राथमिक वाचन–लेखन प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासोबतच वैयक्तिक मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. या वर्गांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन वनिता साळुंखे या करत असून त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे प्रशिक्षण अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि प्रभावी ठरत आहे.

या प्रशिक्षण शिबिराच्या प्रारंभप्रसंगी प्रवीण जाधव (शिव स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान संस्था अध्यक्ष) आणि रुपेश पवार (मोडी लिपी आणि इतिहास अभ्यासक) यांची उपस्थिती लाभली. मोडी लिपी शिकणे म्हणजे आपल्या वैभवशाली इतिहासातील बखरी, राजपत्रे, दस्तऐवज व शिलालेखांशी थेट नाते जोडण्याची दुर्मिळ आणि अमूल्य संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. मोडी लिपीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कजगाव येथील अल्पसंख्यांक मुस्लिम कब्रस्तानाच्या संरक्षण भिंतीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.!!!

भडगाव ता. प्रतिनिधी :-अमीन पिंजारी

कजगाव येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाची संरक्षण भिंत गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णतः कोसळलेल्या अवस्थेत असून, याकडे स्थानिक ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संरक्षण भिंत नसल्यामुळे कब्रस्तानाच्या पवित्रतेसह सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, समाजातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

सदर कब्रस्तानालगत असलेला रस्ता हा वर्दळीचा असून, रस्त्याच्या कडेला फेअर ब्लॉक बसविण्याची मागणी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. मात्र, वारंवार निवेदने देऊनही संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कब्रस्तान परिसरात अतिक्रमण, जनावरांचा वावर तसेच अस्वच्छतेची समस्या निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे अल्पसंख्यांक मुस्लिम कब्रस्तानाच्या संरक्षण व विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या ग्रामनिधीतून आवश्यक कामे करता येणे शक्य असतानाही, त्या निधीचा उपयोग न केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामस्थांच्या मते, निधी उपलब्ध असताना देखील केवळ दुर्लक्ष आणि उदासीनतेमुळे कामे रखडली आहेत.

स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे गावातील इतरही अनेक विकासकामे प्रलंबित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर अधिक तीव्र होत असून, लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कब्रस्तानाच्या संरक्षण भिंतीची उभारणी करावी तसेच कब्रस्तानालगतच्या रस्त्यावर फेअर ब्लॉक बसवून परिसर सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी कजगाव येथील नागरिक व अल्पसंख्यांक समाजाकडून करण्यात येत आहे.

पाचोरा नगरपरिषदेत शिक्षण सभापतीपदी  प्रवीण  ब्राह्मणे यांची निवड

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ चे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची पाचोरा नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहरातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा व चालना मिळेल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

नगरपरिषदेच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते त्यांची निवड जाहीर करण्यात आली. शिक्षण क्षेत्राबाबतची त्यांची सकारात्मक भूमिका, विद्यार्थीकेंद्रित विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन नगरपरिषदेकडून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांनी सांगितले की, शहरातील शाळांच्या मूलभूत सुविधा सक्षम करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, तसेच शिक्षक, पालक व प्रशासन यांच्यात समन्वय साधून निर्णय घेणे यावर विशेष भर दिला जाईल. गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणे, शाळांमधील समस्या मार्गी लावणे आणि आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

या निवडीबद्दल पाचोरा शहरातील नागरिक, सहकारी नगरसेवक, शिक्षकवर्ग तसेच समर्थकांकडून आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यकाळात पाचोरा शहरातील शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करत सर्वत्र त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

गोंडगाव विदयालयात सांस्कृतिक कार्यक्रम रंगतरंग संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय गोंडगाव येथे सालाबादप्रमाणे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम रंगतरंग उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करून विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी. ननावरे यांचेसह मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंडगाव गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील हे होते. पालक संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन माजी विदयार्थी विजय सोनार, माजी विदयार्थी दिनकर झावरु पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बी.जी. ननावरे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख एस. डी. चौधरी व व्ही. ए. पाटील यांनी केले.

यावेळी विदयार्थ्यांनी संगीताच्या तालावर हिंदी व मराठी, अहिराणी, लोकगीत, लावणी, भारुड, पारंपारीक नृत्य , एक पाञी नाटक सादर केले. विदयार्थ्यांनी अतिशय चांगली कला सादर केल्याने

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख पी. व्ही. सोळंके व उपप्रमुख व्ही. ए. पाटील यांनी केले.

कार्यक्रमाप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सर्व सदस्य, पालक ,आजी माजी विद्यार्थी तसेच महिला वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले.

 

विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. ननावरे, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, आर. एस. देवकर, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्हि. सोळंके, बी. डी. बोरसे, एस. एस. आमले, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, एन. ए. मोरे, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्हि. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, नागरीक, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते

पिंप्री विदयालयाचा चिञकलेचा निकाल १०० टक्के.

भडगाव प्रतिनिधी :-

टेक्निकल माध्यमिक विद्यालय पिंप्री बु. ता. पाचोरा शाळेचा महाराष्ट शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंट्री ग्रेड ड्रॉईंग परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. एलिमेंट्री परीक्षेत एकूण ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैक

किर्ती राजेंद्र पाटील

निकिता उमेश पाटील

अक्षरा दिपक पाटील

कावेरी रविंद्र पाटील

वैष्णवी सुनिल अहिरे

योगिता विनोद धोबी

सुषमा कमलाकर धोबी

पायल शशिकांत पाटील

मयुर माया मोरे

उध्दव प्रविण पाटील

जयदीप विश्वासराव बोरसे

आकाराही विद्यार्थी परीक्षेत पात्रता आहे…

त्यांना मार्गदर्शन करणारे

कलाशिक्षक श्री. जितेंद्र रायचंद परदेशी, श्री. संदिप शालिग्राम पाटील, यांचे व संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री भारत सरकार आण्णासो. एम. के. पाटील साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र दादाजी पाटील, तसेच सौ. जयश्री तुकाराम हिरे, श्री. निलेश एकनाथ चव्हाण, श्री. रोहिदास मन्साराम पाटील, सौ. चेतना अशोक सोनवणे, सौ. कविता भिकनराव पाटील, श्री. शिवराज भोजराज पाटील सर्व शिक्षक – शिक्षिका व श्री. प्रताप जनार्दन पाटील, श्री. संजय जगन्नाथ पाटील, श्री. उल्हास रमेश आमले, श्री. सुदाम गोकुळ सोनवणे, श्री. अविनाश पुंडलिक पाटील शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

लाडक्या बहिणींचे महामार्ग रोको आंदोलन; मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प.!!!

भंडारा  प्रतिनिधी :-

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने भंडारा जिल्ह्यात महिलांचा संताप उफाळून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणूक पार पडूनही ही रक्कम अद्याप खात्यात जमा न झाल्याने संतप्त महिलांनी मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत ठिय्या आंदोलन केले.

आज सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने महिलांनी महामार्गावर येत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवासी वाहने, मालवाहू ट्रक आणि खासगी वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे होते की, सरकारने दिलेले आश्वासन केवळ निवडणूक जिंकण्यासाठी होते का, असा सवाल निर्माण झाला आहे. महागाईच्या काळात या योजनेतील रक्कम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती तातडीने देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिलांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित मागणी शासनाकडे तातडीने कळवण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर काही काळाने महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.

आंदोलन मागे घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. मात्र लाडक्या बहिणी योजनेतील आश्वासन लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही महिलांनी दिला आहे.

भडगाव पेठ परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई; ट्रॅक्टरसह १ ब्रास वाळू जप्त.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

मा. तहसीलदार भडगाव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मौजे भडगाव पेठ परिसर, ता. भडगाव येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात यशस्वी कारवाई केली.

या कारवाईदरम्यान अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली सुमारे १ ब्रास वाळू, तसेच ट्रॅक्टर व ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर वाळू कोणतीही अधिकृत परवानगी नसताना वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. जप्त केलेला मुद्देमाल महसूल विभागाच्या ताब्यात घेण्यात आला असून संबंधित चालक व मालकाविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी व महसूल पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. या पथकात ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, समाधान हूल्लूळे, निखिल बावस्कर, प्रसाद दूदूस्कर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

अवैध वाळू उपशामुळे नदीपात्र व पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शासनाच्या महसुलाचाही अपहार होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर यापुढेही सातत्याने आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी अवैध वाळू उपसा अथवा वाहतुकीबाबत माहिती दिल्यास तात्काळ दखल घेतली जाईल, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!