भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरातील यशवंत नगर परिसरात चोरीच्या वाढत्या घटना व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रमुख ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र शांताराम आचारी यांनी केली आहे.
याबाबत दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, यशवंत नगरमधील बजरंग चौक, मारोती मंदिर परिसर तसेच विलास पाटील यांच्या घराजवळील चौक हा भाग अत्यंत वर्दळीचा असून, दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते.
विशेषतः वॉर्ड क्रमांक ९, १०, ११ व १२ मधील रहिवासी या मार्गाचा दैनंदिन वापर करीत असून, अलीकडच्या काळात येथे दुचाकी चोरीसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यास गुन्हेगारी घटनांवर आळा बसेल, गुन्हेगारांवर वचक राहील तसेच पोलिस तपास कार्यास मदत होईल, असा विश्वास आचारी यांनी व्यक्त केला आहे. या मागणीला परिसरातील नागरिकांचाही पाठिंबा असून, पोलिस प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
