मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र जनगौरव परिषद या संस्थेच्यावतीने शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी वांद्रे, मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ॲड. सोपान विठ्ठल बुडबाडकर (लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते) यांना “गर्जा महाराष्ट्र सन्मान पदवी २०२५” प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान सुशीलकुमार शिंदे (माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माजी राज्यपाल आंध्र प्रदेश) यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.
या समारंभास राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे थेट चौदावे वंशज संभाजी राजे जाधवराव (इतिहास संशोधक), दैनिक ‘मुंबई मित्र’ चे संपादक व कामगार नेते अभिजित राणे, ‘जयऱ्या’ या आत्मचरित्राचे लेखक व कवी जयराम सोनावणे, तसेच मैत्री संस्था अध्यक्ष व मुक्त पत्रकार सूरज भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी साहित्यिक कवी ॲड. सोपान बुडबाडकर यांना आपल्या स्वरचित ‘कैदखाना कैफाचा’ या कवितेचे गायन करून सादरीकरण करण्याची संधी मिळाली. साहित्य, सामाजिक कार्य आणि वैचारिक योगदानाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून देण्यात आलेला हा सन्मान त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नवी प्रेरणा देणारा ठरला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
