भडगाव प्रतिनिधी:-
भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित स्व. सौ. साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमात दर्शन विठ्ठल पाटील याने साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्काराची सलग तिसऱ्यांदा (हॅट्रिक) पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
दर्शन पाटील याने शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, शिस्तबद्ध अभ्यास, तसेच विविध उपक्रमांतील सहभागाच्या जोरावर हा बहुमान मिळविला. सातत्याने तिन्ही वर्षे हा सन्मान मिळविणे ही संस्थेच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब ठरली आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मा. श्री. हेरंब कुलकर्णी (शिक्षण तज्ज्ञ व ज्येष्ठ समाजसेवक) यांच्या हस्ते दर्शन पाटील यास सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दर्शनच्या यशाचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दर्शन विठ्ठल पाटील याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, सातत्य, परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, असा संदेश या हॅट्रिक यशातून मिळतो.
सलग तिसऱ्यांदा ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कार पटकावणारा दर्शन विठ्ठल पाटील हा गुणवत्तेची हॅट्रिक करणारा भडगावचा विद्यार्थी.
