मतमोजणी दिवशी गोंधळ झाल्यास तात्काळ कठोर कारवाई
राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
मुंबई :
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदान व मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. काही ठिकाणी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
मतदान व मतमोजणीच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची 16 व 17 डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाघमारे यांनी स्पष्ट केले की, मतदान व मतमोजणीची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडणे अत्यावश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित कठोर कारवाई करावी. केलेल्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांना तसेच राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ कळवावी, अन्यथा चुकीचे चित्र निर्माण होण्याची शक्यता असते.
सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मतमोजणीचे निकाल आणि त्यानंतरची परिस्थिती लक्षात घेता पोलीस प्रशासन व इतर यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवणे आवश्यक आहे. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी, म्हणजे 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही प्रकारची प्रचार जाहिरात इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करता येणार नाही, याबाबत सर्व संबंधितांना सूचित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदान व मतमोजणीच्या दिवशी योग्य बंदोबस्त ठेवण्यात यावा. एखादी घटना घडल्यानंतर कारवाई होत असली तरी ती जनतेसमोर येत नाही, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. हे टाळण्यासाठी कारवाईची माहिती वेळेवर प्रसिद्ध करणे गरजेचे आहे.
