भडगाव शहरात स्वच्छता मोहीम व डास प्रतिबंध फवारणीची मागणी — महिला पदाधिकाऱ्यांचे निवेदन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
सततच्या पावसामुळे भडगाव शहरातील विविध कॉलनींसह ओपन स्पेस भागात पावसाचे आणि फुटलेल्या गटारीमुळे साचलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. या अस्वच्छ परिस्थितीमुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक स्वच्छता मोहीम व डास प्रतिबंध फवारणी तातडीने राबविण्याची मागणी करणारे निवेदन माजी नगरसेविका व शेतकरी संघ संचालिका योजना पाटील, अभिनव संस्था अध्यक्षा डॉ. सुवर्णा पाटील, समन्वयिका मनिषा पाटील, आणि सोनाली पाटील यांनी दिले.
महिलांनी आपल्या निवेदनात साचलेले पाणी काढणे, ओपन स्पेस स्वच्छ करणे, अनावश्यक झुडपे काढणे, फुटलेल्या गटारी दुरुस्त करणे, नवीन पाइपलाइनचे खड्डे बुजविणे आणि नियमित फवारणी मोहीम राबविणे या मागण्या केल्या.
हे निवेदन मुख्याधिकारी रविंद्र लांडे, आस्थापना प्रमुख राहुल साळुंखे, शहर अभियंता अपूर्वा आगळे आणि आरोग्य विभाग प्रमुख छोटू वैद्य यांना देण्यात आले.
मुख्याधिकारी लांडे यांनी याबाबत लवकरच व्यापक स्वच्छता व डास प्रतिबंध मोहीम हाती घेण्यात येईल आणि नागरिकांच्या सर्व तक्रारींचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिले.