जळगावनिवडणूकविशेष

नवरा–बायकोची विजयी जोडी दिग्गजांवर भारी भडगावमध्ये शिवसेनेची भक्कम आघाडी

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने दमदार कामगिरी करत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगांवच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत विस्थापित तरुण नेते लखीचंद पाटील हे किंगमेकर ठरले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्यातून शहरात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या लखीचंद पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

 

या निवडणुकीत लखीचंद पाटील पुरस्कृत नगराध्यक्ष उमेदवाराने विजय मिळवत शिवसेनेचा झेंडा फडकवला आहे. या सोबतच पाटील दाम्पत्यानेही निवडणूक जिंकत शहर भर लक्ष वेधून घेतले आहे. नवरा–बायको दोघेही नगरसेवक म्हणून निवडून येण्याची घटना भडगावच्या राजकारणात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

 

लखीचंद पाटील हे प्रभाग क्रमांक ६ मधून एकूण १३९१ मते मिळवत ६३४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात सर्वसामान्य नागरिक, युवक व महिलांचा मोठा पाठिंबा लाभल्याचे दिसून आले. त्यांच्या प्रचारात विकास, पारदर्शकता व सर्वसमावेशक राजकारण या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता.

 

दरम्यान, त्यांच्या पत्नी समीक्षा पाटील यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला आहे. समीक्षा पाटील यांनी एकूण १३०१ मते मिळवत अवघ्या १४ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. विशेष म्हणजे, त्यांनी दिग्गज नेते प्रताप नाना पाटील यांच्या कन्येचा पराभव केला. हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पारंपरिक राजकारणाला मतदारांनी नाकारत नव्या नेतृत्वाला संधी दिल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे.

 

अवघ्या १४ मतांच्या फरकाने मिळालेला हा विजय कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. मतमोजणीदरम्यान शेवटच्या फेरीनंतर निकाल स्पष्ट होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शहरात विजयाच्या घोषणा देत शिवसेनेचे झेंडे फडकवण्यात आले.

या निकालामुळे भडगाव च्या राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.आगामी काळात शहराच्या विकासासाठी शिवसेना आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. लखीचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव शहरात विकासाला गती मिळेल,अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!