भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील अपक्ष नगरसेवक अलीम शाह यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. युवा सेना जळगाव जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक लखीचंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रवेशामुळे भडगाव शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.
शिवसेनेच्या स्थानिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आदेशानुसार अलीम शाह यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. शिवसेनेची शाल घालून व पक्षचिन्ह देत त्यांचा औपचारिक प्रवेश जाहीर करण्यात आला.
यावेळी बोलताना नगरसेवक लखीचंद पाटील म्हणाले की, शिवसेना ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारी चळवळ असून विकास, पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. अलीम शाह यांचा अनुभव आणि व्यापक जनसंपर्क शिवसेनेस निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पक्षप्रवेशावेळी अलीम शाह म्हणाले की, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र भडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मोठ्या पातळीवर प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्षम नेतृत्व व संघटित पक्षाची गरज असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ७ तसेच संपूर्ण भडगाव शहराच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका समन्वयक युवराज आबा पाटील, व शहर पदाधिकारी, नुकतेच निवडून आलेले प्रभाग क्रमांक ३ चे हॅट्रिक नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा, नगरसेवक इमरान अली सय्यद, प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक हाजी खलील (मिस्त्री), हाजी अल्ताफ खाटीक,राजू शाह, रावसाहेब पाटील, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलीम शाह यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
