जि.प. उर्दू बॉईज केंद्र शाळेत इंग्रजी परीक्षेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरातील जि.प. उर्दू बॉईज केंद्र शाळेत इंग्रजी विषयाची लेखी व तोंडी परीक्षा नुकतीच घेण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. शाळेच्या इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
या परीक्षेत हुजैर आरिफ पिंजारी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक, अकबर असरार बेग मिर्झा यांनी द्वितीय क्रमांक, तर साद अब्दुल गफूर कुरैशी यांनी तृतीय क्रमांक मिळवून आपली योग्यता सिद्ध केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेत विशेष समारंभ आयोजित करून त्यांना पारितोषिके व प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पालकांचेही या प्रसंगी कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्र प्रमुख श्री. खलील शेख मजीद यांनी भूषविले, तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाईद बेग मिर्झा यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजीसारख्या विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम घेण्याचे आवाहन केले.या प्रसंगी शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांची प्रगती आणि पालकांचा सहकार्यभाव पाहून शाळेचे शैक्षणिक वातावरण अधिक सकारात्मक बनल्याचे सर्व उपस्थितांनी नमूद केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लुकमान सद्दीकी यांनी परिश्रम घेतले.