पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यानचा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’. नागरिकांमध्ये तीव्र संताप.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यानचा प्रमुख रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असून, या मार्गावरील प्रवास नागरिकांच्या जिवावर बेतू लागला आहे. अपूर्ण रस्ते काम आणि सुरू असलेला पावसाळा यामुळे परिस्थिती अधिकच भीषण झाली आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक अपघात घडत असून, काहींना गंभीर दुखापती, तर काहींनी थोडक्यात जीव वाचवला आहे.
हा रस्ता नागपूर–मुंबई महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, शालेय वाहने, रुग्णवाहिका, दुचाकीस्वार व मालवाहतूक करणारी वाहने रोजच मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. मात्र रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहता प्रवाशांना ‘जीव मुठीत धरून’ प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात या परिस्थितीबाबत तीव्र संताप असून, संबंधित विभागाने तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.