चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई ३९ किलो अंमली पदार्थ जप्त, किंमत अंदाजे.५० कोटींच्या घरात.!!!
चाळीसगाव प्रतिनिधी :-
चाळीसगाव महामार्ग पोलीस विभागाने कन्नड घाटाजवळ बोढरे फाट्याजवळ एका कारवाईत ३९ किलो अँफेटामाईन हा अति घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य ४० ते ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई काल (२४ जुलै) रात्री गस्तीदरम्यान करण्यात आली. संशयित टाटा ब्रेझा वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँफेटामाईन सापडले. वाहनचालकास अटक करून पुढील चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने महामार्ग पोलीस ठाण्याला भेट दिली आणि अधिकृत माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, हा अंमली पदार्थ दिल्लीहून छत्रपती संभाजीनगर मार्गे बेंगळुरूकडे नेतला जात होता.
आंतरराज्य नाही, तर आंतरराष्ट्रीय रॅकेटची शक्यता वर्तवण्यात येत असून अँफेटामाईनसारखे पदार्थ परदेशातून भारतात मोठ्या प्रमाणावर तस्करीने आणले जात असल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना याची माहिती देण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
आमदार चव्हाण म्हणाले की, “ड्रग्जमुक्त महाराष्ट्र” या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेला बळकटी देणारी ही कारवाई असून, संपूर्ण पोलीस यंत्रणाचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.