होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा – आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रभावी पाठराखण

0 35

होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा – आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रभावी पाठराखण.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

ग्रामीण आणि शहरी भागातील गोरगरीब जनतेसाठी दिवस-रात्र सेवा करणाऱ्या बी.ए.एम.एस. (होमिओपॅथी) डॉक्टरांना गेल्या काही वर्षांपासून बेकायदेशीर डॉक्टर ठरवून त्रास दिला जात होता. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी.ए.एम.एस. डॉक्टरांसाठी एक अधिकृत कोर्स आणि नोंदणीची (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया सुरू केली होती. मात्र त्यावर नंतर काही वैद्यकीय संघटनांनी सुप्रीम कोर्टात आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया स्थगित झाली.

यामुळे हजारो डॉक्टरांचा रोजगार आणि त्यांच्या सेवा अडचणीत आल्या. महाराष्ट्रभरातील हजारो होमिओपॅथी डॉक्टरांनी आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील स्वतः त्या आंदोलनस्थळी पोहोचले आणि डॉक्टरांचे दुःख समजून घेतले. त्यांनी हा विषय राज्य विधानसभेत उपस्थित करत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर ठामपणे मांडला.

आमदार पाटील म्हणाले, “एका बाजूला ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर मिळत नाहीत, दुसऱ्या बाजूला बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे, आणि अशा वेळी खऱ्या अर्थाने सेवा करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणं योग्य नाही.”

या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन महिन्यांत निश्चित निर्णय घेऊन डॉक्टरांना न्याय दिला जाईल, असं आश्वासन दिलं.

आ. पाटील यांनी सरकारचे आभार मानत सांगितलं की, “हे डॉक्टर म्हणजे ग्रामीण जनतेचा आधार आहेत. त्यांना न्याय मिळणं ही काळाची गरज आहे.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!