कै. गुलाबराव जगन्नाथ पाटील विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
कोठळी (ता. भडगाव) येथील कै. गुलाबराव जगन्नाथ पाटील विद्यालयात तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदाविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश प्रा. वि. राजाळे मॅडम होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून पी.एस.आय. लक्ष्मी करणकाळ मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्काराने झाली. यावेळी सरपंच उज्ज्वला पाटील, योजना पाटील, पोलिस पाटील अतुल पाटील, तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी कायद्याचे बाळकडू
न्यायाधीश राजाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार आणि सामाजिक सजगतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा आणि सजग नागरिक होण्याचा सल्ला दिला.
पी.एस.आय. लक्ष्मी करणकाळ यांनी पोक्सो कायदा, दामिनी पथक, गुड टच-बॅड टच यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये सजगतेचा संदेश दिला.
ॲड. महेंद्र पाटील यांनी बालकांचे हक्क विशद केले, तर ॲड. निलेश तिवारी यांनी भारतीय संविधानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. ॲड. घनश्याम मोरे व पी.एल.व्ही. कार्यकर्त्यांनी सायबर गुन्हेगारी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात माहिती दिली.
हृदयस्पर्शी क्षण…
पंचायत समितीचे ए.बी.डी.ओ. सोनवणे यांनी स्वतःच्या आयुष्यातील एक भावनात्मक प्रसंग उलगडत मोबाईलच्या अतिरेकाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांपुढे मांडले. त्यांच्या अनुभवांनी उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सांगत
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. गणेश वेलसे यांनी प्रभावीपणे केले, तर चव्हाण सरांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, त्यांच्यात जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा जागृत झाली.