
प्रशासनाच्या तोंडावर तमाचा; जप्त डंपर तहसील आवारातून गायब.
भडगाव तहसील परिसरातील धक्कादायक प्रकार
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे महसूल प्रशासनासमोर गंभीर समस्या निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाई करत जप्त केलेला अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर काही तासांतच थेट भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कार्यालयाच्या आवारातूनच जप्त वाहन चोरीस जाण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भडगाव तालुक्यातील गिरड परिसरात महसूल विभागाच्या पथकाने रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करत असलेला एम.एच. १५ एच.डब्ल्यू. ८६९९ क्रमांकाचा डंपर पकडला होता. सदर डंपर शिरपूर येथील वाळू माफियाचा असल्याचे बोलले जात असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी तो भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करून उभा करण्यात आला होता.
मात्र कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संबंधित वाळू माफियांनी थेट तहसील कार्यालयाच्या आवारातूनच हा डंपर पळवून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे तहसील कार्यालयासमोर पोलीस व महसूल यंत्रणा असतानाही जप्त वाहन चोरीस जाणे, ही बाब प्रशासनाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
या प्रकरणी भडगाव महसूल विभागाचे पथक भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सदर कारवाईदरम्यान मंडळ अधिकारी दिनेश येंडे, ग्राम महसूल अधिकारी सुनील मांडोळे, व्ही. सी. पाटील, दीपक पाटील, राहुल माळी, शुभम चोपडा, चेतन बैरागी, महसूल सेवक राजू थोरात, माधव सोनवणे, राजेंद्र शेवरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल बोरसे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महत्त्वाचे म्हणजे, तहसील कार्यालय परिसरातून जप्त वाहने गायब होण्याची ही पहिलीच घटना नाही. मागील महिन्यात येथून एक वाळू वाहतूक करणारी ट्रॉली गायब झाल्याचा प्रकार घडला होता. तसेच काही दिवसांपूर्वी एक ट्रॅक्टर देखील तहसील कार्यालयाच्या परिसरातून चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे भडगाव महसूल विभाग जप्त वाहनांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना का करत नाही,.?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांबाबत तातडीने गुन्हे दाखल न होणे तसेच वाळू माफियांवर कठोर कारवाई न होणे, यामुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या गंभीर प्रकारांकडे प्रांताधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच अवैध वाळू व्यवसायावर आळा घालण्यासाठी आणि जप्त वाहनांच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी भडगाव तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.



