श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस — शिवसेनेतील खळबळ
मुंबई प्रतिनिधी :-
शिवसेनेतील दोन महत्त्वाच्या नेत्यांना आयकर विभागाने नोटीस बजावल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनाही आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.
संपत्ती वाढीवरून प्रश्नचिन्ह
संजय शिरसाट यांच्या संपत्तीतील वाढ आणि छत्रपती संभाजीनगर येथील ‘व्हिट्स हॉटेल’ प्रकरणामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकेचा भडिमार केला होता. या व्यवहारातील अनियमिततेबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे
संजय शिरसाट यांनी सांगितले की, “२०१९ ते २०२४ या काळात माझ्या मालमत्तेत झालेल्या वाढीची चौकशी करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आयकर विभाग आपलं काम करत आहे, त्यात काही गैर नाही. मी कायदेशीररित्या उत्तर देणार आहे.”
त्यांनी यासाठी थोडा वेळ मागितला असून, नोटिशीतील अचूक मागणी काय आहे हे स्पष्ट झाल्यानंतर उत्तर दिलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
श्रीकांत शिंदे प्रकरण धुसर
दुसरीकडे, श्रीकांत शिंदे यांना मिळालेल्या नोटिशीबाबत तपशील अद्याप स्पष्ट नाही. ही नोटीस कोणत्या व्यवहारासंदर्भात आहे, ते कोणत्या मुदतीपर्यंत उत्तर देणार आहेत याची माहिती समोर आलेली नाही.
राजकीय कुरघोडी की चौकशी ?
या दोन्ही नेत्यांना आलेल्या नोटिसांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांकडून ही कारवाई म्हणजे “भाजपकडून दबाव आणि कुरघोडी” असा आरोप करण्यात येत आहे, तर सत्ताधारी गट हे “कायदेशीर प्रक्रिया” असल्याचं म्हणत आहेत.
शिवसेनेतील दोन वरिष्ठ नेत्यांना एकाच वेळी नोटीस बजावल्यानं पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींवर नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. येत्या काळात या प्रकरणाला कोण वळण लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.